देश\विदेश

मोदींची हत्‍या करण्यासाठी तयार राहा म्‍हणणाऱ्या काँग्रेसच्या नेत्‍याला भल्या पहाटे अटक!

भोपाळ, दि. १३ ः राज्यघटनेचे संरक्षण करायचे असेल, तर मोदी यांची हत्या करण्यासाठी तयार राहा, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस नेते व मध्य प्रदेशचे माजी मंत्री राजा पटेरिया यांना आज, १३ डिसेंबरला पहाटे साडेपाचला मध्य प्रदेशमधील दमोह येथून अटक करण्यात आली आहे.

पटेरिया यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत हे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मोदी निवडणूक पद्धत संपवतील. पंतप्रधान धर्म, जाती व भाषेच्या आधारावर देशाचे विभाजन करतील. दलित, आदिवासी व अल्पसंख्याकांचे भवितव्य धोक्यात आहे, असेही ते म्हणाले होते.

या वक्‍तव्‍यामुळे त्यांच्याविरोधात पन्ना जिल्ह्यातील पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पटेरियांनी यू टर्न घेत आपल्या बोलण्याचा अर्थ भाजपचा पराभव करा असा होता, असे स्पष्टीकरण दिले. बोलण्याच्या ओघात असे झाल्याचेही ते म्हणाले होते. मी महात्मा गांधींचा अनुयायी आहे. ज्या व्यक्तीने व्हिडिओ शूट केला त्यांनी तेवढाच भाग घेतला. हा व्हिडिओ एडिट करण्यात आला, असा दावा त्‍यांनी केला होता.

कोण आहेत पटेरिया…
६२ वर्षांचे पटेरिया मध्यप्रदेशच्या खजुराहो येथील मूळ रहिवासी आहेत. ते काँग्रेसचे वरिष्ठ नेता आहेत. दिग्‍विजय सिंह मुख्यमंत्री होते तेव्हा ते काँग्रेसच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते. २०१४ ची लोकसभा निवडणूक त्‍यांनी खजुराहो मतदारसंघातून लढली होती. हरल्यानंतर त्यांना २०१९ मध्ये तिकीट मिळाले नाही. संपूर्ण हयातीत त्‍यांच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नव्हता. पण म्हातारपणात नको त्या गोष्टी बरळल्याने आता गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!