छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

एन ११ हर्सूल टी पॉईंट परिसरातील अतिक्रमण काढले, राजकीय दबाव झुगारून महापालिकेची बडी कारवाई !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ एप्रिल – महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभाग मार्फत आज एन ११, हर्सूल टी पॉइंट परिसरात कारवाई करण्यात आली. एका अतिक्रमण धारकाला नोटीस बजावूनही तो अतिक्रमण काढत नव्हता. याशिवाय त्याने राजकीय दबावही प्रशासकीय यंत्रणेवर आणला होता. मात्र, महापालिकेने राजकीय दबाव झुगारून अतिक्रमणावर नियमानुसार कारवाई करून हायकोर्डाच्या आदेशाची अंमलबजावणी केली.

सदर भागात हर्सूल टी पॉइंट पेट्रोल पंप लगत एन ११ या ठिकाणी चौधरी यांनी दहा बाय दहा या आकाराची लोखंडी टपरी बांधून फुटपाथवर गॅरेज टाकले होते. संबंधितास यापूर्वी आठ दिवस अगोदर सूचना देऊन अतिक्रमण जागा रिकामी करणे बाबत कळविण्यात आले होते परंतु सदरच्या व्यक्तीने अतिक्रमण न काढता संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांच्या उपस्थितीत सदर अतिक्रमण काढण्यात आले.

एन 11 स्मशानभूमी लगत एकूण पाच बाय पाच आकाराच्या सहा लोखंडी टपऱ्या होत्या. या लोखंडी टपऱ्यामध्ये विविध प्रकारचे साहित्य विक्री आणि पान टपरी होते. सदर सर्व अतिक्रमणे निष्काक्षित करून जप्त करण्यात आले आहे. तसेच रस्त्यावर असलेले एमआरएफ टायर कंपनीचे जाहिरात बोर्ड आणि हॉटेल इनर राईस यांचे अनधिकृत बोर्ड काढण्यात आले. यानंतर प्यासा वाईन शॉप लगत सर्विस रोडवर बस आणि इतर वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्यासा वाईन शॉपच्या उत्तर दक्षिण बाजूने असलेले पत्र्याचे शेड व इतर सर्व महत्त्वाचे अतिक्रमण बाबत येथील व्यापाऱ्यांनी व हॉटेल चालकांनी दोन दिवसांची मुदत मागून घेतली आहे. सदरची अतिक्रमणे शनिवारी काढण्यात येईल. तसेच जयस्वाल हॉल मंगल कार्यालय आणि राधे कृष्ण मंगल कार्यालय यांनी त्यांच्या जागेवर असलेल्या अतिक्रमण काढण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. या सर्व अतिक्रमण धारकावर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

पुढील आठवड्यात १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने बारापुला गेट, लक्ष्मी कॉलनी लिटिल फ्लॉवर स्कूल ते विद्यापीठ गेट परिसरातील सर्व चार चाकी हातगाड्यांचे व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांची अतिक्रमणे काढण्यात आले. या भागात सदर पथकांनी अतिक्रमण काढून पेट्रोलिंग पण केली आहे.

या पुढेही सतत कारवाई करण्यात येणार आहे. सदरची कारवाई प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे नगररचना कनिष्ठ अभियंता पूजा भोगे, सिडकोचे विभागाचे मिलन खिल्लारे ,इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे व सिडकोचे कर्मचारी यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!