महाराष्ट्र
Trending

सामुदायिक सोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात 25 हजार रुपये वाढ करणार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

पालघर, दि.20 : आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर सामुदायिक विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सामुदायिक विवाहसोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजारांपर्यंत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली.

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार रवींद्र फाटक, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके , जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अशा कार्यक्रमाला प्रत्येकाने आवर्जून वेळ काढून जायला हवे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील वधू-वरांचा विवाह होतो ही अभिमानाची बाब आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रत्येकाने सामुदायिक विवाह सोहळ्याला सहकार्य केले पाहिजे. कर्ज काढून लग्नसोहळे केल्याने अनावश्यक खर्च होतो. असा खर्च टाळता यावा यासाठी असे सामुदायिक विवाहसोहळे गरजेचे असून ही समाज व काळाची गरज आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शेतकरी सन्मान योजनेतून केंद्राचे सहा हजार रुपये व राज्य सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये शेतकरी बांधवांना देण्यात येतात. या भागाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बांद्रा वर्सोवा ब्रिज विरारपर्यंत आणला जाईल. कामगारांसाठी 150 खाटांचे रुग्णालय अंतिम टप्प्यात आहे. विरारपासून कोस्टल हायवे ॲक्सेस कंट्रोल थेट पालघरपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. एमएमआरडीएद्वारे आवश्यक प्रकल्प दिले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!