छत्रपती संभाजीनगरराजकारण

सुप्रीम कोर्टाने या सरकारबद्दल शक्तीहीन, नपुंसक म्हणून मत व्यक्त केलं, सरकारल जनाची नाही पण मनाची तरी वाटायला हवी ! अजितदादांची शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. 2 – आज महाविकास आघाडीची विराट वज्रमूठ सभा संभाजीनगर येथे पार पडली. विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात आदींसह इतर नेत्यांनी सभेला मार्गदर्शन केले. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या सरकारबद्दल शक्तीहीन, नपुंसक म्हणून मत व्यक्त केले. या सरकारल जनाची नाही पण मनाची तरी वाटायला हवी. अशी सडकून टीका अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केली.

यावेळी सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सभेला संबोधित केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी महाविकास आघाडी आपल्या जीवाचे रान करेल. सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचा कणा या नात्याने ते लढतील याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही.

भारतीय संविधानाचा आदर देशातील तमाम जनतेने केला पाहिजे. परंतु सध्या त्याला तिलांजली देण्याचे काम झाले आहे. ज्या पद्धतीने सरकार पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. जर हे असचं घडतं राहिले तर देशातमध्ये देखील व राज्यामधील देखील स्थिरता राहणार नाही. जी देशाला आणि महाराष्ट्राला परवडणारी नाही. त्याच्यातून उद्योगधंदे येणार नाही. लोकांना जे विश्वासाचे वातावरण हवे ते मिळणार नाही. प्रशासनालाही कोण कधी येईल आणि कोण कधी जाईल याचा विश्वास नसेल तर प्रशासन देखील चांगल्या पद्धतीने चालणार नाही. पक्षांतर कायदा असला तरी एक गट वेगळा झाला व त्याला निवडणूक आयोगाने परवानगी दिली. निवडणूक आयोग असे निर्णय देयला लागले तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो की कसं होणार पुढे? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष आहे. न्यायदेवतेवर आपल्या सर्वांचा विश्वास असून न्यायदेवता योग्य निर्णय देईल यावर माझा विश्वास आहे, असे अजितदादा म्हणाले.

मराठवाडा मुक्तीसंग्रासाठी मुख्यमंत्र्यांनी केवळ १३ मिनिटे वेळ देतात आणि ते निघून जातात. एवढी मराठवाड्याची उपेक्षा यापूर्वी कधी झाली नाही. मराठवाडा मुक्तीसंग्रामचे हे वर्ष साजरे करण्यात यावे. यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात यावे. मुक्तीसंग्रामचा इतिहास नव्या पिढीसमोर यावा अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. परंतु याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. याची नोंद मराठवाड्यातील जनतेने घेतली पाहिजे असे अजितदादा म्हणाले.

आज गौरव यात्रा काढल्या जात आहे. माजी राज्यपालांसह पक्षातील नेते व प्रवक्त्यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक दिगज्जांचा यांचा अपमान केला. त्यावेळी या सरकारची दातखिळी बसली होती का, का नाही गौरव यात्रा काढल्या असा परखड सवाल अजितदादांनी केला.

आम्हाला सर्व महापुरुषांपबद्दल आदर आहे. आम्ही सर्व महापुरुषांसमोर नतमस्तक होतो. त्यांनी त्यावेळी काम केले म्हणून आपण हे दिवस पाहतो. त्यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. मधल्या काळात काही स्वातंत्र्यवीर सावरकारांबद्दल काही बोललं गेले. त्या नंतर सर्वांनी त्याबाबत एक भूमिका घेऊन वातावरण शांत केले. पण जाणीवपूर्वक केंद्रीय दोन मंत्री व राज्यातील तीन मंत्री गौरव यात्रा काढत आहेत. गौरव यात्रेला आमचा विरोध नाही पण तुम्ही जे दुटप्पी राजकारण करतात. ते कधीच महाराष्ट्र विसरु शकत नाही, असे स्पष्ट मत अजितदादांनी व्यक्त केले.

सुप्रीम कोर्टाने या सरकारबद्दल शक्तीहीन, नपुंसक म्हणून मत व्यक्त केले. या सरकारल जनाची नाही पण मनाची तरी वाटायला हवी. या पद्धतीने ही लोकं सरकार चालवत आहे. अधिवेशनाच्या काळात विधानभवनाच्या पायऱ्यांवर कांदा उत्पादक, कापूस, सोयाबीन, केळी , संत्री, द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही आवाज उठवला. पण सरकारने त्यांनी ठोस मदत केली नाही. शेतकऱ्यांची थट्टा या सरकारने चालवली आहे. या सरकारच्या काळात रोज ९ शेतकरी आत्महत्या करतो. महागाई वाढली आहे. आपल्या तरुणांना नोकऱ्या मिळत नाही. बेरोजगारी वाढत आहे. सरकार म्हणतं की ७५ हजार सरकारी नोकरी देणार, कधी देणार नोकऱ्या.. तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे, अशी टीका अजितदादांनी केली.

गौरव यात्रा काढल्या जात आहे…खरंच तुमच्या धमक असेल तर केंद्राच तुमच्या विचारांचे सरकार आहे तसेच राज्यात तुमचे सरकार आहे. आम्हाला सावरकरांबद्दल आदर आहे. सावरकरांबद्दल अभिमान आणि आदर असेल तर ताबडतोब सावरकरांनी भारतरत्न देऊन टाका. आहे का तुमच्यात हिंमत.. असा प्रश्न अजितदादांनी यावेळी उपस्थित केला.

केवळ महागाई व बेरोजगारी वरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी वेगवेगळ्या घटना घडल्या व घटना घडत आहेत. हे वातावरण असेच राहिले कोणीही गुंतवणूकदार राज्यात गुंतवणूक करणार नाही. हे राज्याच्या विकासासाठी योग्य नाही, अशी खंत अजितदादांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आणि पवार साहेब या सर्वांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे उत्तम कारभार केला. कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक जगभरात झाले.
आता मात्र आपल्याला पेटून उठावे लागेल. उद्धव ठाकरेंची मशाल, काँग्रेसचा पंजा व राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ इतर मित्र पक्ष असतील सर्वांचा एकोपा आपल्याला टिकवायचा आहे. त्यासाठी आम्ही जीवाचे रान करू. तळागाळापर्यंत ती आपली एकी , ती आपली वज्रमूठ आपल्या सर्वांना टिकवायची आहे अशी शपथ घेऊनच येथून बाहेर पडूयात, असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.

यावेळी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे म्हणाले, ज्या ज्या वेळी दिल्लीश्वरांनी महाराष्ट्राकडे वाकडी नजर पाहिली त्या त्या वेळी या दिल्लीश्वराला मराठवाड्याच्या मातीत गाड्याची ताकद मराठवाड्याने दाखवून दिली आणि ती संभाजीनगरने दाखवून दिली. ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी मांडला. या अर्थसंकल्पात १२ कोटी जनतेची चेष्ठा पाहायला मिळाली, अशी टीका मुंडे यांनी केली.

सरकारच्या विरोधात काही बोललं तर कधी पोलिस घरात येतील सांगता येत नाही. सरकारला चोर म्हटल तर कधी आपले सदस्यत्व काढून घेतले जाईल सांगता येत नाही. सरकारच्या विरोधात जे कोणी बोलेल त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, मग ते पोलिसांच्या माध्यमातून असेल किंवा कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या माध्यमातून असेल अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

महाराष्ट्रातील सरकार हे येथील १२ कोटी जनतेसाठी आहे की दिल्ली, गुजरात, कर्नाटकाला खूश करण्यासाठी आहे. तुम्हाला महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार पाहायचे असेल तर ही वज्रमूठ एवढी आळवा की, यांनी कितीही यात्रा काढल्या तरी त्या यात्रेच्या जत्रा झाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढी आपण सगळ्यांनी काळजी घेऊ. एवढ्या ताकदीने वज्रमूठ उभी करू की महाराष्ट्राकडे वाकडं बघितल त्या दिल्लीश्वराला याच मातीत गाठू असा या वज्रमूठ सभेच्या माध्यमातून संकल्प करूया, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले.

या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. आदित्य ठाकरे, आ. सुनिल प्रभू, खा. अनिल देसाई, आ. अमित देशमुख, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!