महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांवर सरकारकडून अन्याय ! राज्यस्तरीय अधिवेशनात घणाघाती टीका !!

महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू)चे पुण्यात गटप्रर्वतकांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन

पुणे, दि. २४ : राज्य सरकार अंगणवाडी सेविका, आशा, गटप्रवर्तकांवर अन्याय करत असल्याची घणाघाती टीका राज्यस्तरीय अधिवेशनात करण्यात आली. निळू फुले सभागृह, साने गुरुजी स्मारक, पुणे येथे सिटू संलग्न महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने गटप्रर्वतकांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी रित्या पार पडले. या अधिवेशनाला २० जिल्ह्यांतील ३०० प्रतिनिधी उपस्थित होत्या.

अधिवेशनाचे प्रास्ताविक राज्य महासचिव पुष्पा पाटील यांनी केले. सिटू राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन पर भाषणात सरकार गटप्रर्वतकांवर करत असलेल्या अन्यायावर घणाघाती टीका केली. त्यानंतर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्षा शुभा शमीम यांनी गटप्रर्वतकांचे राज्य व देशव्यापी संघटन सिटूसारख्या लढाऊ व देशव्यापी केंद्रीय कामगार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली बांधण्याचे महत्व विशद केले.

त्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी मांडलेल्या समस्यांवर सिटूचे राज्य सरचिटणीस ॲड एम एच शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राज्य अध्यक्षा आनंदी अवघडे यांनी केले. सर्वात शेवटी राज्य स्तरीय ‘गटप्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य’ स्थापन करण्यात आली व प्रत्येक जिल्ह्यातील २ प्रतिनिधींचा समावेश करून राज्य कमिटीची निवड करण्यात आली.

ही संघटना नोंदित करण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटना सिटू व महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनला संलग्न असेल. याची सदस्यता स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. वसंत पवार यांनी सर्व ठराव मांडले व अधिवेशनाने ते एकमताने मंजूर केले. अधिवेशनात सिटू राज्य खजिनदार के आर रघु व घरेलु कामगारांच्या नेत्या किरण मोघे व राज्य पदाधिकारी उज्ज्वला पडलवार व अन्य अनेक राज्य पदाधिकारी व कमिटी सदस्य, शेतमजूर युनियनच्या पदाधिकारी सरिता खंदारे आदी उपस्थित होते.

आनंदी अवघडे यांनी अध्यक्षीय समारोप केला व सिटू जिल्हा सचिव वसंत पवार यांनी आभार मानले.

Back to top button
error: Content is protected !!