छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

अंगणवाड्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार ! ३३६ अंगणवाड्या समाजमंदिरात तर ३०४ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरतात !!

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. २७ :- राज्यातील ज्या अंगणवाड्यांमध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृहे आदी मूलभूत सुविधांपैकी काही सुविधा उपलब्ध नसतील तर त्या संबंधित विभागांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य सतीश चव्हाण यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, ज्या अंगणवाड्यांना इमारती नसतील, त्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या अंगणवाड्या भाड्याच्या जागेत आहेत, त्यांच्यासाठी निधी वाढवून दिला जाईल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ३५०१ अंगणवाड्या असून २७०६ अंगणवाड्यांना स्वतःची जागा आहे. इतर अंगणवाड्यांपैकी ११६ अंगणवाड्या शाळेच्या खोलीत, ३३६ अंगणवाड्या समाजमंदिरात व ३०४ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरतात.

अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच १३ व्या वित्त आयोगाकडून अंगणवाडी बांधकामाकरिता प्राप्त झालेल्या निधीपैकी अखर्चित निधीच्या प्रमाणात अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. काही अंगणवाड्या उघड्यावर सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

सदस्य उमा खापरे यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!