महाराष्ट्र
Trending

बदनापूरच्या धनरेषा अर्बन निधी बँकेचा चेअरमन पैसे घेऊन पळाला ! एजंट महिला, बॅंक मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २२- ज्यादा व्याजदर व कर्ज देण्याचे आमिष दाखवून बॅंकेत खाते उघडायला लावले. त्यानंतर दररोज ५०० रुपयांची बचत करण्यास सांगितले. असे एक नव्हे अनेकांना गंडवून बॅंकेचा चेअरमन पैसे घेऊन पळून गेल्याची तक्रार बदनापूर पोलिसांत दाखल झाली आहे. याप्रकरणी बदनापूरच्या धनरेषा अर्बन निधी बँकेचा चेअरमन व त्यांची पत्नी, बदनापूरची एजंट महिला, बॅंक मॅनेजरसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६१ हजारांची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

चंद्रकांत नारायण एखंडे (वय 25 वर्षे, व्यवसाय किराणा दुकान, रा.बदापुर ता. अंबड जि. जालना) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, त्यांचे बदापूर येथे भक्ती किराणा दुकान आहे. दि. 26/11/2022 रोजी एक महिला व रुपेश सिरसाठ पाडळी (ता. बदनापूर) हे चंद्रकांत नारायण एखंडे यांच्या दुकानात बदनापूर येथे आले. धनरेषा अर्बन निधी लिमिटेड बँक बदनापूर येथून आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची बँक आर. बी. आयच्या अंडर काम करते. बँकेचे व्याज दर खुप जास्त आहे. बँकेचे चेअरमन राहुल भगत व त्यांची पत्नी (रा. पुणे) आहेत. तुम्ही बँकेत पाचशे रुपये रोज भरले तर दोन महिन्यांनंतर बँक तुम्हाला दोन लाख रुपये कर्ज देते.

त्याची आम्ही गॅरंटी घेतो, असे रुपेश सिरसाठ व त्या महिलेने चंद्रकांत नारायण एखंडे यांना पटवून सांगितले. त्या मुळे चंद्रकांत नारायण एखंडे हे त्याच्या धनरेषा अर्बन निधी लिमिटेड बँकेत खाते उघडण्यास तयार झाले. त्यांनी बँकेत खाते उघडण्यासाठी चारशे दहा रुपये घेतले व एक धनरेषा अर्बन निधी लिमिटेड बँकेचे पासबुक दिले. त्या दिवशी चंद्रकांत नारायण एखंडे यांनी बँकेत शंभर रुपये भरले. त्या नंतर सदर महिला व रुपेश सिरसाठ (पाडळी ता. बदनापूर जि.जालना) हे रोज चंद्रकांत नारायण एखंडे यांच्याकडे पैसे जमा करण्यासाठी येत होते. सुरुवातील दोनशे तीनशे रुपये भरत जमा केले. त्यानंतर चंद्रकांत नारायण एखंडे हे रोज पाचशे रुपये भरु लागले. दि. 05/12/2022 रोजी चंद्रकांत नारायण एखंडे यांचा मित्र रामा मानिक एखंडे (रा. बदापूर) याने पण धनरेषा अर्बन निधी बँकेच खाते उघडले व तो पण रोज पाचशे रुपये त्या महिलेकडे व रुपेश सिरसाठ यांच्याकडे जमा करु लागला.

पैसे भरल्यानंतर जमा झाल्याचा मँसेज येत होता. दि. 19/12/2022 रोजी पैसे भरल्यानंतर मला शेवटचा मॅसेज आला. त्यानंतर पैसे भरल्याचा मॅसेज येत नव्हता. त्या मुळे चंद्रकांत नारायण एखंडे यांनी पैसे जमा झाल्याचा मॅसेज येत नाही असे त्या महिलेला सांगितले. तेव्हा त्यांनी आमच्या बँकेच्या सफ्टवेअरचे काम चालु आहे ते झाले की एक दोन दिवसांत परत मॅसेज येण्यास सुरुवात होईल असे सांगितले. चंद्रकांत नारायण एखंडे हे त्या महिलेकडे पैसे जमा करीत राहिले. दि. 27/12/2022 रोजी ती महिला व रुपेश सिरसाठ हे चंद्रकांत नारायण एखंडे यांच्याकडे पैसे घेण्यासाठी आले नाही. त्यामुळे चंद्रकांत नारायण एखंडे यांनी त्यांना त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता त्यांनी सांगितले की बँकेचे चेअरमन राहुल भगत व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सध्या बँक बंद राहील. दोन तारखेनंतर बँकेचे काम सुरळीत चालु होईल असे ती महिला म्हणाली.

दोन तारखेनंतर पण ती महिली व रुपेश सिरसाठ हे पैसे घेण्यासाठी चंद्रकांत नारायण एखंडे यांच्याकडे आले नाही. त्यामुळे चंद्रकांत नारायण एखंडे यांनी त्यांना फोन केला असता त्यांनी आता बँक चालू होणार नाही तुम्ही आम्हाला फोन करु नका असे सांगितले. त्यामुळे चंद्रकांत नारायण एखंडे हे धनरेषा अर्बन निधी बँक बदनापूर येथे धडकले असता सदर बँक बंद झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बँक मॅनेजर दीपक वाघमारे (रा. जालना) याला भेटलो असता त्यांनी बँकेचे चेअरमन राहुल भगत हे बँकेचे पैसे घेऊन पळून गेले आहेत, असे सांगितले.

चंद्रकांत नारायण एखंडे यांनी धनरेषा अर्बन बँकेत एकूण रु 10100/- रु भरले आहेत. तसेच रामा एखंडे याने रु 11000/- रु भरले आहेत. सायगाव (ता. बदनापूर) येथील महिलेनेही या बँकेत रु 40,000/- एफ. डी केलेली होती. त्यांची पण फसवणूक झाली आहे. चंद्रकांत नारायण एखंडे यांच्यासारख्या इतरही बऱ्याच लोकांनी धनरेषा अर्बन निधी बैंक बदनापूर येथे एजन्ट महिला (रा. पवार गल्ली बदनापूर) व रुपेश सिरसाठ (रा. पाडळी ता. बदनापूर) यांचे व इतर एजन्ट मार्फत पैसे भरले असल्याची माहिती मिळाली आहे.

याप्रकरणी चंद्रकांत नारायण एखंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून धनरेषा अर्बन निधी बँक बदनापूरची एजन्ट महिला (रा. पवार गल्ली ता. बदनापूर) व रुपेश सिरसाठ (रा. पाडळी ता.बदनापूर), बैंकेचे मॅनेजर दीपक वाघमारे (रा. जालना) व बँकेचे चेअरमन राहुल भगत व त्यांची पत्नी (रा. पुणे) यांच्यावर बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!