नारेगावच्या जॉली बोर्ड कंपनी मागील प्लॉटिंगवर जेसीबी फिरवला, कॅनॉट प्लेस येथील हॉटेल आयसी स्पायसीला सील ठोकले !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.१४ – महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने झोन क्रमांक पाच अंतर्गत जॉली बोर्ड कंपनीच्या पाठीमागे गट क्रमांक ११३ बटे २ येथील अंदाजे तीन एकर मधील प्लॉटिंग निष्काशीत करण्यात आली. ही कारवाई आज करण्यात आली. याशिवाय कॅनॉट प्लेस येथील हॉटेल आयसी स्पायसीलाही महापालिकेने सील ठोकले.
महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकामार्फत सध्या शहरात अनधिकृत बांधकामे व प्लॉटिंग निष्कासित करण्याची कारवाई हाती घेण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून आज सकाळी साडेदहा वाजता नारेगाव जॉली बोर्ड कंपनी परिसरात कादरी नामक व्यक्तीने सदर परिसरात २० बाय ३० या आकारांमध्ये प्लॉटिंग टाकली होती संबंधित प्लॉटिंग धारकास मागील तीन दिवसांपासून नोटीस देणे कामी शोध घेण्यात येत होता परंतु मोक्यावर ते उपलब्ध होत नसल्याने प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आज कारवाई करण्यात आली.
या प्लॉटिंगमध्ये सदर व्यक्तीने सिमेंट लोखंडी पोल लावून त्यावर प्लॉटिंगचे नंबर टाकले होते. २० बाय ३० मध्ये दहा दहा फुटाचे मुरूम खडीचे रस्ते केले होते ते पूर्णपणे निष्कासित करून जमीन मोकळी करण्यात आली आहे. सदर प्लॉटिंगमुळे शहराच्या सौंदर्यकरणात बाधा निर्माण होत आहे व या ठिकाणी नागरिकांना सुविधा देणे सुद्धा शक्य होत नसल्याने इतर सर्व अनधिकृत प्लॉटिंग आता निष्काशीत करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने कॅनॉट प्लेस येथील आयसी स्पायसी या हॉटेल व्यवसायिक जैन यांनी अनधिकृतपणे राजश्री कॉम्प्लेक्समध्ये जमिनीलगत खोदकाम करून हॉटेल व्यवसायासाठी वापर सुरू केला होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी उच्च न्यायालयात व प्रशासक यांच्याकडे तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने आज त्या भागाचे इमारत निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्त यांनी सदर हॉटेल सील केले आहे. तसेच आयसी स्पायसी हॉटेल मालक यांना याबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
एन -७ येथील दुबे यांचे अनधिकृत बांधकाम थांबवून त्यांचे साहित्य जमा करण्यात आले आहे. तसेच एन -७ येथील अशोक सागर व इतर दोन बांधकामे बंद करण्यात आली आहे. तसेच शेजुळ ठेकेदार यांनी या ठिकाणी मुकुल बालक मंदिर शाळेला जाताना डाव्या बाजूने अतिक्रमण केले होते. या अतिक्रमांमध्ये त्यांनी रस्त्याला पाच फूट पर्यंत झाडे व कुंडी लावले होते तसेच पाण्याच्या टाक्या ठेवल्या होत्या ते सुद्धा आज काढण्यात आले.
यानंतर गट क्रमांक 225 223 224 या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालय मार्फत रस्त्याची मार्किंग होणार असल्याने सायंकाळी या ठिकाणी नोटिसा वाटप करण्यात आल्या आहेत आणि माईक भ्रमणध्वनीद्वारे नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या एका पथकाने एन ०३, एन ०४ भागात रस्त्यावरची अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा केला आहे. यामध्ये चार चाकी हातगाड्या, चार चाकी वाहने अंडा ऑम्लेटच्या गाड्या काढण्यात आल्या आहेत.
ही कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त प्रसाद देशपांडे, अशोक गिरी, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद,पंडित गवळी, रामेश्वर सुरासे, शेख नजर या पथकाने पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe