महाराष्ट्र
Trending

मंडळ अधिकारी रिलायन्स मार्ट समोर लाच घेताना जाळ्यात ! भूखंडाची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी बिल्डरकडून ३१ हजार घेतले !!

रत्नागिरी, दि. २० – सातबारा उतार्यावर भूखंडाची नोंद घेण्यासाठी जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणार्या बिल्डरकडून ३१ हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी अलगद जाळ्यात अडकला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडशीच्या मंडळ अधिकार्यास रिलायन्स मार्ट समोरील सिध्दीविनायक इमारतीच्या पार्कीगमध्ये पंचासमक्ष लाच स्वीकारल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

अमित जगन्नाथ चिपरीकर (वय ३९ वर्षे, मंडळ अधिकारी, खेडशी ता. जि. रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे.

यातील तक्रारदार हे जमीन खरेदी विक्री व जमीन विकासाची कामे करतात. त्यांचे एक पक्षकार यांच्या नावावर असलेल्या जमिनीचा सात बारा उतारा ऑनलाईन प्रमाणित दिसत नव्हता. सदरचा सातबारा उतारा दुरुस्त करण्याचा प्रस्ताव तहसिलदार रत्नागिरी यांना पाठविल्याचा मोबदला म्हणून व तहसीलदार यांचेकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर फेरफारला दुरुस्ती करणेकरीता मंडळ अधिकारी  चिपरीकर यांनी १०,०००/- रुपयांची लाच रक्कमेची मागणी केली.

तसेच त्यांचे इतर दोन पक्षकार यांनी खरेदी केलेल्या भूखंडाचे सातबारा उता-यावर घेण्यात आलेल्या फेरफार नोंदी मंजुर करणेकरीता एक सातबारा उता-याचे ५,०००/- रुपये प्रमाणे एकूण ०७ सातबारा उता-याचे ३५,०००/- रुपये असे फेरफार दुरुस्तीचे १०,००० /- रुपये व फेरफार नोंद मंजुरीचे ३५,०००/- रुपये असे एकूण ४५,०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली. तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी चिपरीकर यांचेविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी येथे दिनांक १९/०४/२०२३ रोजी लाच रक्कमेच्या मागणीची तक्रार दिलेली आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १९/०४ / २०२३ रोजी पडताळणी कारवाई केली असता आरोपी चिपरीकर, मंडळ अधिकारी खेडशी यांनी तक्रारदार यांचेकडे फेरफार दुरुस्तीचे १०,०००/- रुपये व फेरफार नोंद मंजुरीचे प्रत्येकी ३,००० /- रुपये प्रमाणे २१,००० /- रुपये असे एकूण ३१,०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली असल्याचे पडताळणीत निष्पन्न झालेले आहे.

पडताळणीमध्ये निष्पन्न झालेनुसार तक्रारदार यांचे पक्षकारांचे फेरफार दुरुस्तीचे १०,००० /- रुपये व फेरफार नोंद मंजुरीचे प्रत्येकी ३,००० /- रुपये प्रमाणे २१,००० /- रुपये असे एकूण ३१,०००/- रुपये लाच रक्कम तक्रारदार यांचेकडुन दिनांक १९/०४/२०२३ रोजी १९.४२ वाजता रिलायन्स मार्ट समोरील सिध्दीविनायक इमारतीचे पार्कीगमध्ये पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!