छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

सर्व विद्यार्थ्यांना त्यांची पदवी आता ऑनलाईन व्हेरिफाय करता येणार ! विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर न देणाऱ्या महाविद्यालयांचा निकाल जाहीर न करण्याची तंबी !!

प्राचार्यांनी त्वरित कार्यवाही करून अहवाल सात दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश

Story Highlights
  • पदवीधरांच्या प्रमाणपत्रांचे ’ऑनलाईन व्हेरिफिकेशन’सूलभ
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांच्या पदव्या डिजीलॉकरवर अपलोड करणार
  • २ लाख १८ हजार विद्यार्थ्यांच्या पदव्या आतापर्यंत अपलोड करण्यात आल्या आहेत

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – गेल्या दहा वर्षांत पदवी प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे आता ’ऑनलाईन व्हेरिफाय’ करता येणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांच्या पदव्या ’डिजी लॉकर’वर अपलोड करण्यात येणार आहेत.

केंद्रशासनाच्या उच्च शिक्षण मंत्रालयांतर्गत ’नॅशलन अ‍ॅकॅडमिक डिपॉजिटरी’ स्थापन करण्यात आली आहे. या अंतर्गत देशातील सर्व विद्यापीठ व स्वायत्ता संस्थामधील विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे, गुणपत्रिका ऑनलाईन उपलब्ध असणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २०१२ ते २०२२ या १० वर्षांतील पदवीधरांच्या पदव्या ’डिजीलॉकर’मध्ये अपलोड करण्याचे काम कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केल आहे.

या १० वर्षात सुमारे १० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे अपलोड करण्यात येणार आहेत. यापैकी २ लाख १८ हजार विद्यार्थ्यांच्या पदव्या आतापर्यंत अपलोड करण्यात आल्या आहेत. उर्वरित पदवी प्रमाणपत्र अपलोड करण्याचे काम सुरु आहे. अनेक विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर तसेच ई-मेल आयडी देण्यात न आल्यामुळे पदव्या अपलोड करण्यात अडथळे येत आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.भारती गवळी, उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा, तसेच युनिकचे संचालक डॉ.प्रवीण यन्नावार, प्रोग्रामर राजेश राठोड, दतात्रय पर्वत व सहकारी यासाठी प्रयत्नशील आहेत.

.तर निकाल घोषित होणार नाहीत

या संदर्भात परीक्षा विभागाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवाहन केले आहे, विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान एम.के.सी.एल संकेतस्थळावर माहिती सादर करताना सर्व विद्यार्थ्यांचा एकच मोबाईल क्रमांक भरलेले आहेत. असे आढळून आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे आपल्या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्राची माहितीमध्ये अपलोड करता येत नाही. विद्यापीठाचे परीक्षा अर्ज हे संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत विद्यापीठास सादर करण्यात येतात. त्यामुळे ही सर्व जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची आहे. त्याबाबत प्राचार्यांनी त्वरीत कार्यवाही करून कार्यवाहीचा अहवाल सात दिवसांच्या आत या कार्यालयास सादर करावा. अन्यथा आपल्या महाविद्यालयाचे निकाल घोषित करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.भारती गवळी यांनी कळविले आहे.

प्रमाणपत्रांचे ‘व्हेरिफिकेशन’ सुलभ होईल: कुलगुरू

देश-विदेशात खासगी व सरकारी क्षेत्रात नोकरीस लागलेल्या तरुणांची कागदपत्रे विद्यापीठाकडे ’व्हेरिफिकेशन’साठी पाठविण्यात येतात. ’डिजीलॉकर’मध्ये कागदपत्र उपलब्ध केल्यास याची आवश्यकता राहणार नाही. तसेच सुरक्षितता व कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरजही आगामी काळात राहणार नाही. या सर्व बाबींचा विचार करता संबंधित महाविद्यालयांनी आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन वेळेत डाटा पाठवावा. आगामी काळात पदवी सोबतच गुणपत्रिका देखील डीजी लॉकर मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!