छत्रपती संभाजीनगर
Trending

दोन दशकानंतरही विद्यार्थ्यांमधील ऋणानूबंध कायम, अर्थशास्त्र विभागात माजी विद्यार्थी मेळावा !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – दोन दशकांपूर्वी पदव्यूत्तर शिक्षण घेताना जपलेले मैत्रीचे ऋणानूबंध आजही कायम असल्याची प्रचिती अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी मेळाव्यात दिसून आली. २० वर्षांनंतर विभागात आलेल्या विद्यार्थ्यांनी आठवणीचा उजाळा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अर्थशास्त्र विभागात २००३ या शैक्षणिक वर्षात एम ए अर्थशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक १४ मे २०२३ रोजी संपन्न झाला. या मेळाव्यात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वीस वर्षांपूर्वीच्या विविध आठवणी सांगितल्या. विभागातील वर्गखोल्या, बाक, ग्रंथालय, कार्यालय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी आलेले प्रसंग सादर केले.

मुंबई विद्यापीठातील प्रा. डॉ. सुरेश मैंद, प्रा. विजय मांटे, अंमळनेर येथील सिद्धार्थ कॉलेजचे प्रा. मारुती चंदनशिवे इत्यादींनी मनोगत मांडले. माजी विद्यार्थ्यांनी त्यांना अध्यापन केलेल्या शिक्षकांची अध्यापन कौशल्य, त्यांची जीवनशैली इत्यादीवर प्रकाश टाकला. विद्यापीठाने दिलेले गुणवत्तापूर्ण शिक्षण, कमवा शिका योजना, वस्तीगृह, ग्रंथालय सेवा इत्यादीमुळे आमच्या जीवनाला आकार मिळाला असे आवर्जून नमूद केले. प्रा. डॉ. धनश्री महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याची राष्ट्राला गरज असल्याचे नमूद केले व नवीन बदल आत्मसात करण्याचे आव्हान केले.

प्रा. डॉ. एस.टी. सांगळे यांनी विद्यार्थ्यांनी विभागाशी असलेले नाते अधिक वृद्धिंगत करण्याची गरज व्यक्त केली व अशा विद्यार्थ्यांनी वर्षनिहाय माजी विद्यार्थी मेळावे आयोजित करण्याची गरज व्यक्त केली. विभागप्रमुख प्रा पुरुषोत्तम देशमुख यांनी विभाग आणि माजी विद्यार्थी यांनी संयुक्त कार्यक्रम हाती घेण्यास विभाग सतत प्रयत्न करत असल्याने विद्यार्थ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांनी विद्यार्थ्यांनी विभागाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. अर्थशास्त्र विभाग माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याची गरज मांडली.

माजी विद्यार्थ्यांनी विभागाच्या व विद्यापीठाच्या विकासात योगदान देण्यासाठी कृती कार्यक्रम हाती घेण्याची गरज व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात माजी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमास डॉ. दिलीप अर्जुने, विभागातील प्रा.डॉ. एस. एस. नरवडे डॉ. सी. एन. कोकाटे, डॉ. के. व्ही. खंदारे, डॉ. नागनाथ कोल्हे व इतर शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!