ADS 2

गणपती उत्सव
मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया,
तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता

अवघ्या दीनांच्या नाथा,
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे..
चरणी ठेवितो माथा..

ADS 3

आठवतेय का…. ?? ऐंशीच्या दशकात प्रल्हाद शिंदेंचे गाजलेले हे अजरामर भावगीत…!! गणेश मूर्ती आणण्याकरिता सकाळीच बाहेर पडलो आणि या गीताचे बोल कानी आले. सहाजिकच मन भूतकाळात गेले, नकळत जायकवाडीत शिरलो,आठवला जायकवाडीचा साधाच परंतु उत्साहाने भारलेला भव्य गणेश उत्सव….!!!

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

तेव्हा जायकवाडीत घरोघरी गणेशाचे आगमन होई. सर्वजण आपापल्या परीने गणपती पुढे सजावटीची आरास मांडत. संध्याकाळी घरोघरी गणपती दर्शन व आरास बघायला जाणे हमखास ठरलेले असे. शाडू मातीचे गणपती बसवले जात. तोपर्यंत ‘ प्लास्टर ऑफ पॅरिस ‘चे कौतुक आले नव्हते.
ऐंशीच्या दशकात, शाळकरी वयात आम्ही मुलामुलांनी बाल गणेश मंडळ स्थापन केले. दहा-पंधरा रुपये वर्गणी गोळा व्हायची.

छान पैकी गणपती आणला जाई. आम्ही दोघे चौघे पैठणहून एसटी मधून गणपती आणत असू. ३ ते ४ रूपयात प्रसन्न मुद्रेची, प्रशस्त मूर्ती मिळे. दरवर्षी एखाद्या मित्राच्या घरी गणपती बसवत असू. त्याभोवती छान डेकोरेशन करत, बाजूला किल्ला बनवून त्यावर मातीचे सैनिक ठेवले जात असत. एखाद्या वर्षी हिरवीगार शेती, त्यातून वाहणारी नदी, रस्ता, त्यावर पूल, बाजूला घर असे बरेच काही सजावटीसाठी असे.. नुसती धम्माल असायची. १० दिवस कसे जायचे हे कळायचे नाही….!!!

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शाळेतील सजावट केलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गणपती बाप्पा विराजमान होत. लाऊड स्पीकर वरून विविध गाण्यांच्या, भक्तीगीतांच्या रेकॉर्ड वाजवल्या जात. रोज नवनवीन रांगोळी काढली जाई. त्याकाळी जायकवाडीत ‘एक गाव – एक गणपती’ संकल्पना पाटबंधारे विभागाकडून रहिवाशांच्या सहभागाने राबवली जाई. सगळेच उत्साहाने सहभागी होत. उत्सवाच्या दहा दिवसांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची नुसती रेलचेल असायची.

प्रथितयश कलाकारांची गाजलेली नाटके, ऑर्केस्ट्रा, कथाकथन, एकपात्री प्रयोग, चित्रपट, जादुगार रघुवीर यांचे जादूचे खेळ आणि बरेच काही येथेच अनुभवायला मिळाले…

याकाळात अवघी जायकवाडी भक्ती रसात न्हाऊन निघे. पाटबंधारे खात्याचे अधिकारी सर्व कार्यक्रमांना जातीने हजर असत. रमेश देव, सीमा देव, वसंत शिंदे, रविंद्र महाजनी,उषा नाईक, अरुण सरनाईक, मधु कांबीकर, अरुणा भट, स्वरुपकुमार आदी नाट्य – चित्रपट कलावंतांची नाटके म्हणजे एक मेजवानीच….!!!

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

वर्हाडकर प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे एकपात्री प्रयोग, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार यांसारखे मातब्बर साहित्यिक व त्यांची कथाकथने येथेच अनुभवली. ऑर्केस्ट्रा आणि गणेशोत्सव हे समीकरण जणूकाही ठरलेलेच होते. दीपा व लक्ष्मीकांत काळे जोडीचा सुर-सिंगार ऑर्केस्ट्रा हमखास असायचा. शाळे समोरच्या पटांगणातील स्टेजवर रात्री जागवुन पाहिलेले ते विविध कार्यक्रम आजही लख्खपणे आठवतात.

आज उपलब्ध असलेली भौतिक ऐश्वर्याची कोणतीही साधने तेव्हा नव्हती. सणवार,उत्सव जोमाने साजरे व्हायचे. लोक समरस होऊन एकमेकात मिसळत. रिती रिवाज, संस्कृती आणि माणुसकी जोपासली जायची. कमी गरजा आणी भौतिक सुखांचा बडेजाव नसल्यामुळे माणसे सुखी, समाधानी होती.छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हायजेनिक फूड, बाटलीबंद पाणी, तऱ्हेवाईक प्रोटिन्स, वगैरे नसताना कोणीही आजारी पडत नसे. अख्या जायकवाडीचे आजारपण एकटा ‘सरकारी दवाखाना’ लीलया सांभाळत असे….!!! भक्तीरसाकरिता जोगेश्वरी, हणुमंताचे व पावन गणपती मंदीर होतेच. घटमाळेत मुधलवाडीच्या देवी दर्शनला व वर्षातून एकदा पिंपळवाडीच्या ऊरूसात चक्कर व्हायचीच.

सकस आहार, साधी राहणी आणि चांगली विचारधारा या त्रिसूत्रीवर संपूर्ण जायकवाडी जोमाने धावत असे.खरंच, खूप चांगला काळ होता तो…. गणेश उत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उजळणी झाली, इतकेच….!!

जायकवाडीच्या ‘अनंत आठवणींचे’ पौष्टिक टॉनिक प्रत्येकाला वेळोवेळी ताजेतवाने करते.कधीकाळी जायकवाडीत वावरलेल्या प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे या गोड आठवणींचा नाजूक कप्पा नक्कीच दडलेला आहे. त्यात अलगद शिरण्याचा हा एक छोटेखानी प्रयत्न.
जय जायकवाडी

  • दीपक माने
    अतिरिक्त कार्यकारी अभियंता,
    महावितरण, औरंगाबाद

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा