महाराष्ट्र
Trending

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर: ७ व्या वेतन आयोगातील वाढीव महागाई भत्ता जूनच्या पगारात मिळणार !!

मुंबई, दि. ३०- राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून सुधारणा करण्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार राज्य शासनाने त्याच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय जारी केला आहे.

शासनाने असे आदेश दिले आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्याचा दर ३८ % वरुन ४२% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे जून २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात. त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!