महाराष्ट्रराजकारण
Trending

आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पोलिस आयुक्तांना महिला आयोगाचे निर्देश !

मुंबई, दि. २८ – आमदार संजय शिरसाट यांनी महिला नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या वक्तव्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त यांना दिले आहेत.

यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सुषमा दगडुराव अंधारे यांचा तक्रार अर्ज आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. आपल्या सुलभ संदर्भासाठी त्यांनी आयोगाकडे केलेल्या अर्जाची प्रत सोबत जोडली आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी दि.२६.०३.२०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आणि माध्यम प्रतिनिधींसमोर अर्जदार यांच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल. असे वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात यावा, असे अर्जदार यांनी नमूद केले आहे.

राजकीय / सामाजिक क्षेत्रातील महिलेचा अवमान करून त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. अर्जदार सुषमा अंधारे या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत, त्यांच्याबाबत टीका करताना लोकप्रतिनिधीकडून अश्लाघ्य भाषेचा वापर करणे ही गंभीर बाब आहे. सबब उपरोक्त प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.

तरी सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी व तसे अर्जदारास कळवावे. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार आपण केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल ४८ तासांत आयोग कार्यालयास पाठविण्यात यावा, असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत.

Back to top button
error: Content is protected !!