राजकारण
Trending

बीडमध्ये अजितदादांनी फिरवली जादूची कांडी ! योगेश क्षीरसागर यांच्यासह ३५ नगरसेवक ५ झेडपी सदस्य, ७ पंचायत समिती सदस्य आणि २९ सरपंचांचा पक्ष प्रवेश !!

योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- अजितदादा पवार

मुंबई, दि. २४- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडलण्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मराठवाड्यात बीडमध्ये पहिली जाहीर सभा घेऊन शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, राष्ट्रवादीतील अजितदादा पवार गट अॅक्शन मोडवर आला. बीड जिल्ह्यात राजकारणात परिचित असलेली जादूची कांडी यंदा अजितदादांनी फिरवली असून बीडचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह ३५ नगरसेवक ५ जिल्हापरिषद सदस्य, ७ पंचायत समिती सदस्य, आणि २९ सरपंचांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करून जोरदार धक्का दिला आहे. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.

खरीप पीक काही प्रमाणात गेले आहे. पिण्याच्या पाण्याची, हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे. लोकांना आताच प्रश्न पडला आहे. मात्र मराठवाड्यात परतीचा पाऊस येत असतो. तरीदेखील काळजी घेण्याची गरज आहे. धरणातील पाणीसाठा तुलनेने कमी आहे. ही नवीन समस्या, हे नवीन संकट राज्यावर आले आहे. परंतु आपण कसलीही काळजी करु नका, कसलेही संकट आले तरी तुमच्या पाठिशी राज्य सरकार आहे हे कृतीतून आपण दाखवून मदत करण्यासाठी कुठे तसुभरही कमी पडणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला. बीड येथील नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

गरवारे क्लब हाऊस येथे पार पडलेल्या प्रवेश कार्यक्रमात डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह ३५ नगरसेवक ५ जिल्हापरिषद सदस्य, ७ पंचायत समिती सदस्य, आणि २९ सरपंचांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी अजितदादा पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. २७ ऑगस्टला सभेला येणार आहो, त्याअगोदर राज्याचा कृषिमंत्री म्हणून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची बैठक घ्या, असे धनंजय मुंडे यांना सांगितले आहे. त्यामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री, पाणी पुरवठा मंत्री यांना या बैठकीला घ्या, अशा सूचना दिल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.

सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यात कुठेही आम्ही बदल होऊ देणार नाही, आम्ही ढळणार नाही अशी ग्वाहीही अजितदादांनी यावेळी दिली. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी मजबुतीने उभे रहा. तुमची सर्वांची साथ त्यांना महत्त्वाची आहे. बीडमध्ये एक चांगलं नवीन नेतृत्व पुढे येऊ दे, असे आवाहनही त्यांनी केले.

वेगळ्या पद्धतीने प्रचार व प्रसार करण्याचा किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. अल्पसंख्याक समाजाला आपण असुरक्षित आहोत ही भावना तुमच्या मनात येऊ देणार नाही, ही भूमिका घेऊन काम करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात गतिमान करण्यासाठी विकासाला कामाला वेग द्यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. विकासाचे नवे पर्व म्हणजे अजित पर्व म्हणून कामाला सुरुवात करत आहोत असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांचे सुनिल तटकरे यांनी विशेष आभार मानले. बीड बांधवांनी सोबत येत आपल्या कामाची पोचपावती दिली आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवत आपण आलात त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे कौतुक केले. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बीड जिल्ह्याचा विकास व्हावा, म्हणून अजितदादांवर विश्वास ठेवून आपण आलात त्याबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी सर्वांना धन्यवाद दिले.

यावेळी आमदार प्रकाश सोळंके, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार संजय दौंड, राजकिशोर मोदी, कल्याण आखाडे, बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, भारतभूषण क्षीरसागर, दीपाताई क्षीरसागर, सारिका क्षीरसागर, बापू गवते आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!