महाराष्ट्र
Trending

पोलिस भरतीवेळी उमेदवारांना त्रास, मृत्यूच्या दुर्घटना टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे ४ ते सकाळी १० वेळेत घ्या !

पोलिस भरतीवेळी उमेदवारांची होणारी गैरसोय दूर करण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून विधानसभेत मागणी

मुंबई, दि. ३ मार्च – पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांच्या निवास, भोजनाची सोय करावी. त्यांना स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. महिला उमेदवारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. धावण्याच्या चाचणीवेळी उमेदवारांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे ४ ते सकाळी १० यावेळेत घ्यावी, आदी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केल्या.

विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून पोलिस भरती केंद्रांवरच्या गैरसोयींचा मुद्दा उपस्थित करताना अजित पवार यांनी मुंबईसह राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. भरती केंद्रांवर तरुण मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांच्या निवास, भोजनाची गैरसोय होत असल्याने, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी दूर केल्या पाहिजेत याकडे लक्ष वेधले.

पोलिस शिपाई भरतीसाठी, इंजिनियर, डॉक्टर, एमबीए, एमएस्सी झालेले तरुण येत आहेत. गावखेड्यातल्या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची ही मुलं आहेत. उच्चशिक्षण घेऊनही नोकऱ्या नसल्याने हे तरुण पोलिस भरतीसाठी येत आहेत. त्यांची काळजी घेणे ही आपली, शासनाची जबाबदारी आहे. मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये भरतीच्या वेळी, गणेश उगले या १७ वर्षांच्या तरुणाला १६०० मीटर धावल्यानंतर चक्कर आली आणि तो कोसळला.

त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तिथं त्याचा मृत्यू झाला. मुंबईत भरतीसाठी आलेल्या, अमर अशोक सोलंके या २७ वर्षांच्या तरुणाला, तो राहत असलेल्या हॉटेलमध्ये, हार्टअ‍ॅटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

भरती केंद्रांवर येणाऱ्या तरुणांची निवासाची सोय सभागृहात किंवा बंदिस्त ठिकाणी केली पाहिजे. आंघोळ व स्वच्छतागृहांची सोय असली पाहिजे. महिला उमेदवारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली पाहिजे. वैद्यकीय उपचारांची सोय ठेवली पाहिजे. धावण्याची चाचणी आपण दुपारी भर उन्हात घेतो अशी विनंतीही अजित पवार यांनी केली.

पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणांपैकी ज्यांची निवड होईल किंवा ज्यांची होणार नाही, त्या सर्वांच्या मनात शासनाबद्दल एक चांगली भावना निर्माण करण्याचे काम आपण केले पाहिजे, असेही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!