छत्रपती संभाजीनगर

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व पालकमंत्री संदिपान भुमरेंमध्ये राडा, हातवारे करून एकमेकांच्या अंगावर धावले ! पालकमंत्री म्हणजे जहागिंरी नाही, दानवेंनी सुनावले खडे बोल, पहा व्हिडियो !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७- छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींमध्ये आज शाब्दिक चकमक उडाली. विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यात निधी वाटपावरून खडाजंगी झाली. ही काय तुमची जहागिरी नाही असे अंबादास दानवे यांनी सुनावताच त्यावर होय, आज आमचीच जहागिरी आहे, असे हेकेखोर बोल पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दानवेंना सुनावले. यामुळे संपूर्ण बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार उदयसिंग राजपूत यांनी निधीवाटपात दुजाभाव केला जात असल्याच्या आरोपानंतर हा गदारोळ उठला.

निधी वाटपात होत असलेल्या दुजाभाववरून वादाला सुरुवात झाली. विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, असं नाही.. पालकमंत्री म्हणजे काय जहागिरी नाही… यावर पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, आज आमची जहागिरी आहे. यानंतर वाद इतका वाढला की, हे दोन्ही नेते मोठ-मोठ्याने एकमेकांना बोलू लागले. एकमेकांकडे हातवारे करून धावून जाऊ लागले. विशेष म्हणजे सुरुवातीला सर्वच जण याकडे पाहात होते. सुरुवातीला कोणीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही.

दरम्यान, ज्येष्ठ नेते तथा माजी विनाधनसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी दोघांना समजावून सागून शांततेचे आवाहन केले. कालांतराने हा तणाव निवळला. तत्पूर्वी मंचासमोर असलेल्या एका आमदाराने निधी वाटपात जाणीवपूर्वक दुजा भाव करत असलयामुळे भर सभेत पालकमंत्री संदिपान भुमरे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावली. यावेळी एक पोलिस कर्मचारी आला व त्याने ती भिरकावलेली कागदपत्रे जमा केली. यानंतर लोकप्रतीनिधींमध्ये शाब्दिक चकमकीला सुरुवात झाली. ही चकमक एकमकांकडे रागाने हातवारे करण्यापर्यंत पोहोचली.

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात गेल्या एक वर्षांपासून शीतयुद्ध सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. प्रत्येकजण एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. यातच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे निमित्त मिळाले. आधीच धूस-फुस असलेल्या या दोन गटांच्या नेत्यांमध्ये निधीवाटपावरून खडाजंगी आज पहायला मिळाली. जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या साक्षिने हा सर्व तमाशा झाला. निधी कोणाला मिळाला नाही आणि कोणाला मिळाला हा संशोधनाचा विषय असून लोकप्रतिनिधींच्या एकमेकांच्या राग-लोभापायी आज या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जाहीर झालेली ही बाचाबाची जिल्ह्याची अब्रु घालवणारी ठरली.

Back to top button
error: Content is protected !!