छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

बेशिस्त वाहनधारकांची आता काही खैर नाही, मनपा नियुक्त एजन्सी पोलिसांसमवेत गाड्या उचलणार ! फोर व्हिलर टोईंग केल्यास २ हजारांचा दंड, उचललेल्या गाड्या छावणी पोलिस स्टेशन आणि गरवारे मैदानाची जागा निश्चित !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नियुक्त एजन्सी आता पोलिसांसमवेत बेशिस्त वाहने उचलणार आहे. फोर व्हिलर टोईंग करून नेल्यास २ हजारांचा दंड तर उचललेल्या गाड्या छावणी पोलिस स्टेशन आणि गरवारे मैदानाची जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली. यासंदर्भात आज स्मार्ट सिटी कार्यालयात झाली.

छत्रपती संभाजीनगर शहरातील बेशिस्त वाहने पार्किंग संदर्भात आज दिनांक 04/10/2023 रोजी सायंकाळी 05.00 वाजता स्मार्ट सिटी कार्यालय येथे बैठक झाली. या बैठकीस आयुक्त, महानगरपालिका, पोलीस आयुक्त, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, उपायुक्त-1, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-1), पोलीस उपायुक्त (मुख्यालय), सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतुक शाखा), वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक आणि व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत शहरातील बेशिस्त वाहने उचलणे संदर्भात महानगरपालिकेने एजन्सी नियुक्त केली असून वाहतूक शाखेच्या पोलीसांसमवेत सदरील एजन्सी काम करणार असल्याचे सांगितले. सदरील कार्यवाही करतांना प्रामुख्याने ज्या ठिकाणी वाहने लावण्यासाठी पांढरा पट्टा आखणी केलेला आहे त्याच ठिकाणी बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीसांच्या सूचनेनूसार अजूनही काही ठिकाणी पांढरा पट्टा मार्किंग करण्यात येईल.

कारवाई करतांना Announcement करणे, वाहने उचलणारे एजन्सीचे कर्मचारी विशिष्ट ड्रेस आणि ओळखपत्रासह असतील, सदर कर्मचा-यांचे वर्तणूक प्रमाणपत्र पोलिस प्रशासनाकडून पडताळणी करणे, कारवाईचे वाहनांवर व्हिडीओ कॅमेरा असेल, वाहने उचलतांना वेळ व ठिकाण नमूद असल्याचा फोटो काढणे आवश्यक राहील. दंड भरताना नागरिकांना याबाबत शंका असल्यास पडताळणी करता येईल. उचलण्यात आलेली वाहने ठेवण्यासाठी सद्या छावणी पोलीस स्टेशन आणि गरवारे मैदान या जागा निश्चित आहेत तसेच पोलीस प्रशासनामार्फत जागांची पडताळणी करून वाढीव जागा निश्चित करण्यात येतील. पोलीस विभागामार्फत सणांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपातील पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात येतील. वाहन परत घेतांना वाहनाच्या मालकीबाबत ओळख पटविणे आवश्यक राहील, या मुद्यांबाबत निर्णय झाले.

कारवाई दरम्यान दुचाकी वाहनांसाठी रू.200/-, हातगाड्यांसाठी रू.300/-, गाड्यांना जामर लावणेसाठी रू.500/- चारचाकी वाहने टोईंग करणेसाठी रू.2000/- याप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार असून याव्यतिरिक्त पोलीस प्रशासनामार्फत नो पार्किंग बाबत दंड आकारणी वेगळी करण्यात येईल. महानगरपालिकेकडे जमा झालेल्या शुल्काच्या रक्कमेतून शहरातील वाहतुक सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतील.

आयुक्त, महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त यांचेकडून व्यापा-यांचे सर्व शंकाचे समाधान होऊन बैठक झाली. व्यापारी महासंघातर्फे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करण्यात आले व शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी याप्रमाणे प्रयत्न सुरू राहणे आवश्यक असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!