कन्नड
Trending

दिव्यांग आणि बचतगटाच्या महिलांना योजनांचा आधार, मंचावरून खाली येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ : अंध, दिव्यांग यांना मदतीच्या साधनांच्या वाटपासाठी स्वतः मंचावरून खाली येत दिव्यांग बांधवांची मोठ्या आस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विचारपूस, दिव्यांगांना विविध उपयोगी साहित्याचे केलेले वाटप, बचतगटाच्या महिलांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला विविध योजनांच्या लाभामुळे हातभार मिळाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला मदतीचा हात आम्हाला दिलासा देणारा असल्याच्या भावना लाभार्थी बोलताना व्यक्त करत होते.

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या अभियानामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला. महसूल, कृषी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वन विभाग त्याचबरोबर इतर विभागांच्या विविध योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. एकूण दीड लाख लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विविध योजनांचा लाभ देण्यात आला. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील लाभार्थी या अभियानात सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी अंध, दिव्यांग यांच्या मदतीच्या साधनांच्या वाटपासाठी स्वतः मंचावरून खाली आले. दिव्यांग बांधवांची मोठया आस्थेने विचारपूस केली. दिव्यांगांना विविध उपयोगी साहित्याचे वाटप केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला मदतीचा हात आम्हाला दिलासा देणारा होता, अशा भावना दिव्यांग बांधवांनी बोलताना व्यक्त केल्या.

‘शासन आपल्या दारी” या उपक्रमाने आमच्या आर्थिक प्रगतीला आणि विविध योजनांच्या लाभ घेण्यात सुलभता आली आहे. कृषी बरोबरच महिलांच्या संदर्भात असलेल्या योजनामुळे आमच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला हातभार लागला आहे. आम्हाला जोडव्यवसाय आणि बचतगटाच्या माध्यमातून आमची आर्थिक प्रगती तसेच शेतीविषयक कामकाज करण्यास सुलभता निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया अनेक लाभार्थ्यांनी बोलताना व्यक्त केल्या.

सैनिक कल्याण विभागाच्या अंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थी भाऊसाहेब भाऊराव नवल म्हणाले, मी राष्ट्रपती पदक विजेता असून माझ्या कुटुंबाला जो काही लाभ मिळाला आहे, यामुळे माझ्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण आणि इतर काम करताना सुविधा निर्माण होत आहे.

नेवपूर तालुका कन्नड येथील अर्चना शेळके म्हणाल्या, कोरोनाच्या कालावधीत पतीचे निधन झाल्यामुळे मला मुलांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत महिला बालकल्याण विभागाकडून देण्यात आली होती. जी काही मदत मिळाली त्याच्यातून मला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य झाले आहे.

रुक्मिणी एकनाथ रावते यांना दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत ‘जयपूर फूट’ च्या माध्यमातून मला स्वत: च्या पायावर उभा राहण्यासाठी ख-या अर्थाने एक आधार मिळाला, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागामध्ये महिला बचतगटाचे जाळे मोठ्या विश्वासाने आणि उमेदीने उभे राहिले आहे. उमेद अभियानाअंतर्गत महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाल्यामुळे महिला स्वयंपूर्ण होत आहेत. स्वामी समर्थ महिला बचतगटासाठी हातनुर येथील अनिता बिडवे आणि वंदना पवार यांना दुग्धव्यवसायासाठी आर्थिक मदत मिळाली. कल्पना चावला बचत गटासाठी सुनीता नलावडे यांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

शासन आपल्या दारी या अभियानामध्ये पशुसंवर्धन, कृषी, आत्मा त्याचप्रमाणे वनविभाग, कामगार विभाग, आदिवासी विभाग आणि इतर महत्त्वपूर्ण विभागाच्या विविध योजनांचा लाभ या उपक्रमात देण्यात आला.

शासन आपल्या दारी या अभियानाची जिल्हा प्रशासनाने केलेली ही तयारी उत्तम असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केलेल्या कौतुकाने जिल्हा प्रशासनातील अधिकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पिण्याचे पाणी, जेवण तसेच उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीचा मंडप याची सुविधा व नेटके नियोजन कौतुकास्पद होते. नागरिकांना योजनांची माहिती आणि लाभ मिळावेत यासाठी प्रत्येक विभाग तत्परतेने कार्यरत होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आगमनावेळी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करत हात उंचावत त्यांचे स्वागत केले.

Back to top button
error: Content is protected !!