महाराष्ट्र
Trending

बीड जिल्ह्यातील १२ हजार शेतकऱ्यांचे बँकखाते गोठवणाऱ्या बजाज अलियांज विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा: धनंजय मुंडे

सर्व शेतकऱ्यांचे सीबील बिघडणार नाही याची काळजी घेऊन बँकखाते पूर्ववत करून द्या;धनंजय मुंडेंची विधानसभेत मागणी

मुंबई दि.२ मार्च – बीड जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांचे बँक खाते बजाज आलियांज या विमा कंपनीने चुकीचा पीक विमा जमा झाल्याचे कारण देत गोठवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला तसेच त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या सिबिलवरही झाला. अशा प्रकारे शेतकऱ्यांचे बँक खाते बँकेला कळवून गोठवणे हे बेकायदेशीर असून संबंधित कंपनीवर शासनाने गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली.

खरीप हंगाम २०२२ मधील विमाधारक शेतकऱ्यांपैकी सुमारे १२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १२ कोटी रुपये रक्कम बजाज अलियांज विमा कंपनीने जमा केले होते. मुळात शेतकऱ्यांना पात्र असूनही विमा मिळत नाही आणि त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले तर एवढा मोठा व्यवहार करणारी विमा कंपनी जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून पैसे आल्याचे सांगते हे अत्यंत अव्यवहारी आहे असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी नमूद केले.

ऐन अडचणीच्या काळात बँक खाते गोठवल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या खात्यावरील जमा पैसे उचलता येत नव्हते. त्या काळात विमा जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता ते १२ हजार शेतकरी नेमके कोणते, याबाबतही संभ्रम असल्याने अनेक शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला.

तसेच विमा कंपनीच्या चुकीच्या वसुली धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सिबिलवरही परिणाम झाला व त्याचा त्रास भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज घेताना होऊ शकतो असेही धनंजय मुंडे म्हणाले. विमा कंपनीच्या या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध राज्य शासनाने विमा कंपनी विरोधात गुन्हे दाखल करावेत, तसेच संबंधित शेतकऱ्यांच्या सिबिलवर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश विमा कंपनीला द्यावेत व विमा कंपनीने केलेल्या चुकीमुळे शेतकऱ्यांना जो त्रास झाला, त्याबाबत विमा कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी केली.

यावर राज्य सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची नोंद घेतली असून योग्य ती कारवाई तातडीने केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले.

Back to top button
error: Content is protected !!