महाराष्ट्र
Trending

१२५ अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची पोलिसांना घाई ! FIRमध्ये पोलिसांचा आंदोलकांवर भयंकर आरोप, सर्व पोलिसांसह गाडी जाळून टाका यांना जिवंत सोडूच नका !!

जालना: शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे जिल्हा प्रशासनासह पोलिसांचे आंदोलकांना आवाहन

संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – अंतवाली सराटी येथे काल दुपारी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस पथकाला मिळालेल्या आदेशानुसार वडीगोद्री येथून निघून जालन्याकडे येत असताना 21:00 वाजेच्या सुमारास अंबड रोडवरील अंतरवाला फाटा या ठिकाणी आंदोलनस्थळी पोहोचले. अंतरवाला फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर रोडवर जमलेल्या अज्ञात 100 ते 125 लोकांनी रोडवर टायर पेटवून आंदोलकांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप पोलिसांनी केला असून याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हाही दाखल केला आहे. FIRमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर धक्कादायक आरोप केला. सर्व पोलिसांसह पोलिस गाडी जाळून टाका असा भयंकर आरोप पोलिसांनी एफआयआरमध्ये केला आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांचा एफआयआर दाखल करण्याची पोलिसांनी तत्परता का दाखवली नाही ? असा संतप्त सवाल आंदोलकांकडून करण्यात येत आहे. महिलांना रक्त निघेपर्यंत लाठीचार्ज करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला ? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत असून पोलिसांनी १२५ जणांवर केलेला एफआयआर हा एकतर्फी असल्याचाही आरोप आंदोलकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची सत्यता तपासानंतर समोर येईलच. दरम्यान, या घटनेत आंदोलक आणि काही पोलिस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

फोन आला अन् पोलि पथक निघाले- याप्रकरणी चंदनझीरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल लहू पाटील यांच्या फिर्यादीवरून १२५ अज्ञातांवर तालुका जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल लहू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 01/09/2023रोजी ते पोलिस स्टेशनला हजर असतांना पोलीस नियंत्रणकक्ष जालना येथून पोलिस स्टेशन वायरलेस सेटवर कॉल आला की, पोलिस स्टेशन चंदनझीरा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी हे अंतरवाली सराटी या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने अंबड पोलीस ठाणे येथे बंदोबस्ताच्या तयारिनीशी रिपोर्ट करतील.

पोलिस पथक अंतरवाली सराटी गावात जाण्यासाठी निघाले- पोनि राजपुत यांच्या आदेशाने पोनि राजपुत, पोलिस उपनिरीक्षक राहुल लहू पाटील, पोहेकॉ शिंदे, पोकॉ डेहंगळ, चालक पोहेकॉ कडुळे असे 18:55 . वाजता पोलिस स्टेशनची 01 मोबाईल वाहनासह रवाना झाले. पोलिस स्टेशन अंबड येथे पोहोचल्यावर सदर ठिकाणी IG, SP व इतर वरिष्ठ अधिकारी हजर होते. त्या ठिकाणी बंदोबस्ताच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकारी यांच्यात चर्चा होवून पोलिस पथक सर्व ताफ्यासह अंतरवाली सराटी या गावात जाण्यासाठी निघाले होते.

पथक वडीगोद्रीत असतानाच आला पुन्हा फोन- पोलिस पथक वडीगोद्री येथे असताना पोनि. राजपुत यांना पोलिस स्टेशन चंदनझीरा येथून फोन आला की, पोलिस स्टेशन हद्दीतील मोतीबाग नागेवाडी येथे काही लोक जमा होवून रोडवर टायर जाळून येणा-या जाणा-या गाड्या आडवून रस्ता रोको करत आहे. अशी माहीती मिळाल्याने पोनि. राजपुत यांनी सदरची माहीती SP यांना देवून त्यांच्या तोंडी आदेशाने पोलिस पथक, अधिकारी व कर्मचारी तसेच अंतवाली सराटी येथे दुपारी बंदोबस्तकरीता आलेले पोलिस स्टेशन चंदनझीराचे पोउपनि शिंदे व पोहेकॉ वाघ वडीगोद्री येथून निघून जालन्याकडे येत असताना 21:00 वाजेच्या सुमारास अंबड रोडवरील अंतरवाला फाटा या ठिकाणी पोहचले. सदर ठिकाणी रोडच्या लगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर रोडवर 100 ते 125 लोकांचा जमाव जमलेला होता. सदर जमावातील लोकांनी रोडच्या मधोमध टायर जाळून घोषणा देत रोडवर दोन्ही बाजूने येणा-या जाणा-या गाड्या आडवून ठेवल्या होत्या. पोलिस पथक त्या ठिकाणी पोहोचले.

पोलिसांच्या गाडीवर दगडफेकी व जिवंत जाळून टाकण्याचा पोलिसांचा FIRमध्ये धक्कादाय दावा  – पोलिसांची गाडी पाहताच जमावातील सर्व लोकांनी घोषणा देत पोलिसांच्या दिशेने पोलीस गाडीवर दगडफेक करत गाडी जवळ आले. पोलिस गाडीवर दगडफेक होत असल्याने पोलिस गाडीतच सिट बोनटच्या आड बसले होते. ते सर्वजन गाडी जवळ येवून पोलीसांची गाडी आतमध्ये असणा-या सर्व पोलिसांसह जाळून टाका यांना आज जिवंत सोडूच नका असे म्हणत दगडफेक करतच होते.

त्या दरम्यान सरकारी वाहनाचे चालक पोकों कडुळे यांना गाडीची काच फुटून डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताच्या कोप-यावर डोक्याच्या डावे बाजुस दगडाचा मार लागला. तसेच पोनि राजपुत यांनाही उजव्या हाताच्या कोनीवर मार लागला आहे. जमावातील लोक सरकारी गाडी पेटवण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिस कसेबसे जीव वाचवून गाडीतून बाहेर पडले. बाजुस असणा-या शेतात पळून गेले. पोलिस पळत असताना पोलिसांच्या मागे जमावातील काही लोक मारण्यासाठी पाठीमागे लागून दगडफेक करत होते. याचदरम्यान जमावातील लोकांनी पोलिस स्टेशन चंदनझीराची सरकारी गाडी जाळून टाकली.

याप्रकरणी चंदनझीरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल लहू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जमावातील १२५ लोकांविरुध्द कलम 307, 353, 332, 336, 440, 143, 147, 148, 149 भादवी सह कलम 4सार्वजनिक संपत्ती हाणी प्रतिबंधक अधिनियम 1984 अन्वये तालुका जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!