छत्रपती संभाजीनगर

घरच्यांसाठी प्रेम झिडकारून तिनं लग्न केलं, पण सत्य लपलं नाही… मग सुरू झाला खुनशी खेळ!; हाफमर्डरच्या केसमध्ये आता तरुणीचा भाऊ जेलमध्ये जाणार!!, वाळूज एमआयडीसीतील थरार

वाळूज, दि. १२ ः दोघांचं प्रेमप्रकरण जोरात सुरू होता. पण तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं. तिच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडं लावून दिलं. तीही घरच्यांसाठी लग्न करून गेली… पण सत्य लपलं नाही. तिच्या पतीला पत्‍नीचं आधीचं अफेअर कळलं… त्यानं तिला विचारलं, नंतर तिच्या प्रियकरालाही विचारलं… प्रियकराने आधी होतं, आता काहीच नाही, असा पवित्रा घेतला. पण यामुळे अफेअरचा विषय कन्‍फर्म झाल्यानं पतीने तिला सोडून दिलं… आपल्या बहिणीचं आयुष्य खराब झालं अन्‌ तेही तिच्या प्रियकरामुळे, असा समज तिच्या भावाचा झाला आणि मग सुरू झाला खुनशी खेळ… शेवटी व्हायचं तेच झालं. १० डिसेंबरला सकाळी साडेदहाला वाळूज एमआयडीसीतील मोरे चौकात बहिणीच्या प्रियकरावर त्‍याने कोयत्‍याने हल्ला चढवला. यात प्रियकर गंभीर जखमी झाला. त्‍याला घाटी रुग्णालयात दाखल केले असून, वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तरुणीच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भूषण खैरनार (रा. वडगाव कोल्हाटी, ता. औरंगाबाद) असे हल्लेखोराचे नाव असून, पवन मारुती हाके असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पवनचे भूषणच्या बहिणीशी तीन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते, असा दावा तक्रारीत पवनच्या आईने केला आहे. अडीच वर्षापूर्वी तिचे लग्न झाले.

एक वर्षापूर्वी पवनचेही लग्न झाले. लग्नानंतर तीन-चार महिन्यांतच तिच्या नवऱ्याने पवनला कॉल करून दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल विचारणा केली होती. त्यावर पवनने आमचे प्रेमसंबंध होते. पण लग्न झाल्यावर काहीच नाही, असे सांगितले. पण यामुळे प्रेमसंबंध होते हे स्पष्ट झाल्याने तिच्या पतीने तिला नांदवण्यास नकार दिला. याचा राग भूषणला होता. तो पवनशी वारंवार वाद घालत होता. चार महिन्यांपूर्वी पवनने भूषणविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता.

अधूनमधून ओॲसिस चौकात हॉटेलवर येऊन तो पवनला जीवे मारण्याची धमकी देत होता. तुझ्यामुळे माझ्या बहिणीचे आयुष्य बर्बाद झाले असे म्हणायचा. १० डिसेंबरला सकाळी भूषण हॉटेलवर पुन्हा आला व धमकी देऊन गेला. सकाळी साडेदहाच्या सुमारास हॉटेलवरील सामान संपल्याने पवन मोरे चौकात सामान आणण्यासाठी गेला होता.

काही वेळातच रक्‍तबंबाळ अवस्थेत तो परतला. मोरे चौकात धरमकाट्याजवळ भूषणनने कोयत्‍याने हल्ला केल्याचे त्‍याने सांगितले. त्‍याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पवनची आई सुमन यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरिक्षक गौतम वावळे करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!