महाराष्ट्र
Trending

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानासाठी गाव पातळीवरचे नियोजन ! सर्व योजनांची माहिती व लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी यंत्रणा लागली कामाला !!

जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत दिव्यांगाची नोंदणी होणार पूर्ण- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Story Highlights
  • दिव्यांगांना कागदपत्रांसह उपस्थित राहून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येईल
  • अभियानात दिव्यांगाना सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्याचे व देण्यात येणाऱ्या लाभाचे सुयोग्य नियोजन यंत्रणांनी केले पाहिजे

नांदेड, दि. 8 :- विविध प्रवर्गातील दिव्यांगाच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगाच्या तक्रारी जाणून घेवून त्याच ठिकाणी त्याचा निपटारा केला पाहिजे. ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानात सर्व संबंधित यंत्रणांनी दिव्यांगाना देण्यात येणारे सर्व लाभ एकाच ठिकाणी मिळतील यासाठी गावपातळीवरचे नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियानाच्या पूर्वतयारीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बापु दासरी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार तसेच विविध संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

राज्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात येत्या 11 ऑक्टोंबरला या अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानात प्रत्येक विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या योजनांचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना कसा देता येईल याची रुपरेषा निश्चित करावी. प्रत्येक विभागाने आपल्या योजनांच्या माहितीचा प्रचार करावा. जेणे करुन दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांची माहिती होईल. त्या अन्वये अभियानाच्या दिवशी दिव्यांगांना कागदपत्रांसह उपस्थित राहून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाला दिल्या.

या अभियानात दिव्यांगाना सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्याचे व देण्यात येणाऱ्या लाभाचे सुयोग्य नियोजन यंत्रणांनी केले पाहिजे. या अभियानात दिव्यांगाना आरोग्य विमा कवच योजनेत अर्ज भरुन घेणे, आयुष्यमान भारत कार्ड वितरण, मतदान कार्ड, महात्मा फुले जन आरोग्य योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या योजना, निरामय योजना अशा अनेक योजनांची माहिती देण्याचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सूचित केले.

Back to top button
error: Content is protected !!