छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

सिडको परिसरात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई, आठ रस्त्यांवरील अतिक्रमणांवर फिरला जेसीबीचा हात !!

नागरिकांना अतिक्रमण मुक्त सिडको परिसर ठेवण्याचे मनपा प्रशासनाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, दि. २ – सिडको परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली. आठ रस्त्यांवरील अतिक्रमणांवर जेसीबीने हात फिरवल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर जनहित याचिका क्रमांक १०९/२०१५ अंतर्गत गुरूवार (दि. २) सिडको अंतर्गत येणाऱ्या एन-५, वोखार्ड चौक, रेणुका माता मंदिर परीसर, एन-७ येथील पेट्रोल पंप लगतचा परीसर, एसबीओए चौक या ठिकाणी असलेले हरितपट्टा मधील अतिक्रमण तसेच अनधिकृतपणे हरीत पट्टया मधील दहा बाय पंधरा, पंधरा बाय पंधरा या आकारातील एकूण आठ रस्ते जेसीबीच्या सहाय्याने, गट्टू निश्वाषित करून लगेच रस्ता बंद करण्याची कारवाई संबंधित विभागाने सुरू केली. उद्यान  विभागाच्या वतीने या ठिकाणी जाळी बसविण्यात येणार आहे.

या नंतर सिडको कॅनॉट परिसरातील बीएसएनएल कार्यालयासमोरील रस्त्यावर, फुटपाथवर अनधिकृतपणे थाटलेली मोमोजची एकूण सहा लोखंडी चारचाकी गाड्यांसह किरकोळ सामान जप्त करण्यात आले.  तसेच या ठिकाणी बंद अवस्थेत असलेल्या रिक्षामध्ये पंम्चरचे दुकान टाकण्यात आले होते. त्याचे किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले.

याशिवाय चिश्चिया चौक ते एमजीएम कडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान अनधिकृतपणे थाटण्यात आलेली अंडा आम्लेट, पावभाजी, पाणीपुरी यांच्या हातगाड्यासह किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले. यात चार हातगाड्यांचा समावेश आहे. याशिवाय अतिक्रमण पथकाने एसबीओए चौक ते सिडको कॅनॉट गार्डन दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी गाड्याही हटविण्यात आल्या.

ही कारवाई मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरीक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, सिडकोचे अधिकारी उदयराज चौधरी, इमारत निरीक्षक आर. एम. सुरासे, पी.बी. गवळी, सय्यद जमशेद, मजहर अली, सागर श्रेष्ठ, नगररचना विभागाचे प्रतिनिधी यांच्यासह पोलिस पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.

दरम्यान, शहराचे विद्रुपीकरण, रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर यापुढेही मनपा, अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे कोणीही रस्त्यांवर अडथळा निर्माण होईल असे वर्तन न करण्याचे व अतिक्रमण मुक्त सिडको परिसर ठेवण्याचे  आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!