महाराष्ट्र
Trending

पोलिसांच्या पाल्यांना 10 टक्के जागा राखीव, परदेशी भाषा प्रशिक्षण ! उद्योग उभारणीसाठी पोलिस आयुक्त फंडातून मदत मिळणार !!

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत असलेल्या ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्रा मार्फत देण्यात येणाऱ्या परदेशी भाषेच्या प्रशिक्षणासाठी पोलिसांच्या पाल्यांना 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेच्या माध्यमातून ताडदेव येथील पोलीस वसाहत आणि वरळी येथील मुंबई पोलीस कॉसिल्लिंग अँड प्लेसमेंट सेंटर एल विभाग 3 येथे कौशल्य प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री लोढा यावेळी बोलत होते. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनावणे, सशस्त्र पोलीस दलाच्या अपर पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह, पोलिस सह आयुक्त एस.जयकुमार, पोलीस उपायुक्त प्रज्ञा झेडगे, अस्मिता संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र छांजड यासह पोलिस व पोलिसांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले, पोलीस आणि त्यांच्या कुटूंबियांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबविण्यात येत आहे. फक्त कौशल्य शिकविण्यावर नाही तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला यामध्ये अजून बदल करता येतील. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. एखाद्या प्रशिक्षणार्थीला स्वयंरोजगार करावयाचा असल्यास त्याचे मार्गदर्शन करण्यात येईल, सरकारी योजना आणि त्याचे लाभ कसे घ्यायचे याचे देखील मार्गदर्शन करता येईल असे मत मंत्री लोढा यांनी व्यक्त केले.

कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उद्योग उभारणीसाठी पोलीस आयुक्त फंडातून मदत मिळणार : विवेक फणसळकर
मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले की, केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात कौशल्य उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा उपक्रम आहे. मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता सुरू केलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून काही तरी करू इच्छिणाऱ्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. महिलांना घरची जबाबदारी सांभाळत असतानाही एखादा व्यवसाय करता येवू शकतो आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची संधी मिळेल. कौशल्य विकासाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तू आपल्याच पोलिस कुटुंबाना विक्री करण्यासाठी देखील व्यासपीठ उपलब्ध देण्याबरोबरच तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण घेवून व्यवसाय करण्यासाठी पोलिस आयुक्ताच्या फंडातून मदत करण्यात येईल.

अशा प्रकारे राबविण्यात येणार कौशल्य प्रशिक्षण वर्ग उपक्रम
पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सासायटी माध्यमातून बृहन्मुंबई मधील ताडदेव, वरळी, नायगांव, कलिना आणि मरोळ या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण उपक्रम घेतले जातील. यामध्ये आयटी, गारमेंट, ब्युटी ॲण्ड वेलनेस, ऑटोमोटिव्ह ॲण्ड फुड प्रोसेसिंग क्षेत्रातील एकूण १० प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. किमान ३०० तास ते कमाल ५०० तासाचे कौशल्य प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील. वय वर्षे १८ ते ४५ वयोगटातील महिला, पुरूष आपल्या आधार ओळखपत्राच्या आधारे प्रशिक्षणासाठी नोदंणी करू शकतात.या प्रशिक्षणासाठी एन.आय.सी च्या माध्यमातून बायोमॅट्रीक पध्दतीने प्रशिक्षणार्थीची हजेरी घेण्यात येणार आहे. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेद्वारास शासनातर्फे NSQF स्टॅण्डर्ड चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.प्रशिक्षणापश्चात प्रशिक्षणार्थीला रोजगार संधी, शिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Back to top button
error: Content is protected !!