महाराष्ट्र
Trending

लग्नाच्या मिरवणुकीत डान्स करताना धक्का लागला म्हणून धारदार शस्त्राने पोटात खुपसले ! बीड शहरात डिजे समोर वादाला तोंड, दोघांवर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३०- लग्नाच्या मिरवणुकीत डान्स करताना धक्का लागला म्हणून एकाने हात पकडले अन् दुसर्या मुलाने धारदार शस्त्राने पोटात खुपसले. बीड शहरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जखमी युवकाला सुरुवातीला सरकारी दवाखाना व त्यानंतर लगेच तेथून लोटस हॉस्पिटल बीड येथे दाखल करण्यात आले.

सोमय नरसिंग कासेवाड (वय 24 वर्षे व्यवसाय शिक्षण, रा. माळीवेस बीड) असे जखमी युवकाचे नाव आहे. सोमय कासेवाड याने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, तो सॉफ्टवेअरचे ट्रेडींग करीता पुणे येथे असतो. दि. 28.11.2023 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास मित्र अक्षय शिराळे याचे लग्न असल्यामुळे बीडला आला होता. सायंकाळी 07.30 वाजेच्या सुमारास सोमय कासेवाड हा त्याच्या मित्रासोबत शिराळे याच्या घरी पोहचला.

लग्नाची मिरवणुक शिराळे याच्या घरापासून आशीर्वाद लॉन्स येथे जाणार होती. सदरच्या लग्नाला सोमय कासेवाड याच्या ओळखीचे मित्र आले होते. सर्वजण मिरवणुकीमध्ये डी.जे. समोर डान्स करत होते. मिरवणुक रात्री 08.15 वाजेच्या सुमारास कौसरनगर कमान पर्यंत आली असताना डान्स करताना धक्का लागल्याच्या कारणावरून एका मुला बरोबर सोमय कासेवाड याची शाब्दिक चकमक झाली.

त्या मुलाने सोमय कासेवाड यास शिवीगाळ करून चापट मारली. त्यावेळी मित्राने भांडण सोडवले. त्यानंतर भांडण करणाऱ्या मुलाचा एक मित्र तेथे आला. दोघांनी शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देवून तेथून बाजूला गेले. त्यानंतर काही वेळातच ते दोघे पुन्हा परत आले व डान्स करु लागले. सोमय कासेवाड हा डान्स करत असताना त्या दोघांनी खांद्यावर हात टाकून सोमय कासेवाड यास कौसरनगर कमानीकडे घेवून गेले.

तेथे एकाने सोमय कासेवाड याचे दोन्ही हात पकडले व दुसर्याने त्याचेकडे असलेल्या कोणत्यातरी धारदार शस्त्राने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पोटावर समोरच्या बाजुने जोरात खुपसले. त्यानंतर मित्र आल्याने ते दोघे निघून गेले.  जखमी सोमय कासेवाड यास तात्काळ सिव्हील हॉस्पिटल येथे आणले. त्यानंतर लगेच तेथून लोटस हॉस्पिटल बीड येथे दाखल करून उपचार घेतले. याप्रकरणी सोमय कासेवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीड शहर पोलिस स्टेशनमध्ये दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!