कन्नडछत्रपती संभाजीनगर
Trending

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन मालमत्ता विक्री करणार ! पिशोर येथील आदर्श मंगल कार्यालय व नाचनवेल येथील आदर्श सहकारी रुग्णालय विकून ठेविदारांचे पैसे देणार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १०- दोनशे कोटींपेक्षा ज्यास्त घोटाळ्याने संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन मालमत्ता विक्री करण्यात येणार आहे. मार्केटमधून होणारी वसूली व ठेवीदारांच्या ठेवी यात मोठी तफावत असल्याने ठेविदारांच्या चिंतेत वाढ होत असतानाच या दोन मालमत्ता विक्रीतून मिळाणारी रक्कम काही प्रमाणात वसूल होणार असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्था छत्रपती संभाजीनगर या पतसंस्थेत हजारो ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेवर प्रशासक समितीची नियुक्ती करण्यांत आलेली आहे. प्रशासक समिती कडून कर्ज वसुली करण्यांत येत आहे. येणे कर्ज रकमेपेक्षा ठेवीची रक्कम जास्त असल्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी संस्थेच्या मालमत्तांची विक्री करण्यांत येणार आहे. संस्थेच्या मालकीच्या कन्नड तालुक्यातील पिशोर येथील आदर्श मंगल कार्यालय व नाचनवेल येथील आदर्श सहकारी रूग्णालय या दोन मालमत्ता विक्रीस काढण्यात आलेल्या असून त्याबाबतचा तपशिल शासनाच्या www.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. निविदा भरण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे. इच्छुकांनी निविदा भराव्यात असे आवाहन प्रशासक समितीचे अध्यक्ष सुरेश काकडे यांनी केले आहे.

यापूर्वी १९ कर्जदारांच्या मालमत्ता प्रत्यक्ष ताब्यात घेण्याचे आदेश, मालमत्तेच्या लिलावातून २०७ लाख वसूल करून ठेवीदारांना देण्याचा मार्ग मोकळा

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी आदर्श नागरी पतसंस्थेच्या कर्जदारांच्या मालमत्तेच्या ताब्याचे आदेश जारी केले आहे. १९ कर्जदारांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश दिले असून ही मालमत्ता विकून सुमारे २०७ लाख रुपये लिलावाद्वारे मिळतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रशासक समितीच्या अध्यक्षांनी दिलेली माहिती अशी की, आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म. छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेवर प्रशासक समिती नेमण्यात आलेले आहे. पतसंस्थेच्या थकबाकीदार कर्जदारांकडून कर्ज वसुली करण्यासाठी संस्थेतर्फे कर्जदारांनी तारण ठेवलेल्या मालमत्तांची सहकार कायद्यानुसार जप्ती करून त्या मालमत्तांचा ताबा मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी 19 कर्जदारांच्या मालमत्तांचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी आदेश जारी केले आहेत. त्यातून पतसंस्थेची कर्ज रक्कम रुपये 207.92 लाख लिलावाव्दारे वसुल होईल.

काय आहे प्रकरण- (शंभर शंभर कोटीचे दोन गुन्हे सिडको पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहे. त्यातील एक प्रकरण असे)

संपूर्ण राज्यात गाजत असलेले आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरण आता वेगळ्या वळणावरू येऊन ठेपले आहे. नियमांचे कुठलेही पालन न करता कर्जदारांना कर्जाची खैरात वाटप करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला असून  यातील बहुतांश कर्जदारांनी ज्या उद्देशासाठी कर्ज घेतले आहे तो उद्देश साध्य न करता रक्कम उचलली. अनेकांनी कर्जच्या रकमेची परतफेडही केली नाही. यासर्वाला अध्यक्ष व संचालक मंडळ जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून कर्जदारांची यादीही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत सन 2016 ते 2019 या कालावधीचा चाचणी लेखापरीक्षण अहवालात १०० कोटींपेक्षाही जास्त गैरव्यवहार झाला असल्याचे नमूद केल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास आबाजी मानकापे यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सहकारी संस्थेचे (ग्राहक) विशेष लेखापरीक्षक धनंजय हिरालाल चव्हाण (पत्ता बाळासाहेब पवार सहकार भवन, जुना मोंढा, जाफर गेट, छत्रपती संभाजीनगर) यांनी सिडको पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेच्या आदेशानुसार आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या., शिवज्योती कॉलनी, एन-6 सिडको, छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे मुख्य कार्यालय व कॅनॉट प्लेस येथील शाखेत सन 2016 ते 2019 या कालावधीचे चाचणी लेखापरीक्षण अहवाल दि. 13-06-2023 रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (छत्रपती संभाजीनगर) कार्यालयास सादर केला आहे.

संस्थेचे चाचणी लेखापरीक्षण करत असताना सन 2016 ते 2019 या आर्थिक वर्षामध्ये या संस्थेच्या जिल्हयातील संलग्न शाखांचे व्यवस्थापक व मुख्य शाखेचे मार्फत आलेले कर्ज मागणी अर्ज व अनुषंगिक कागदपत्रे यांची मुख्य कार्यालयातील कर्ज विभागाकडून छाणनी करून ते पोटनियमामधील तरतुदीचे निकषानुसार पात्र असल्यास संस्थेचे संचालक मंडळाने सभेत सर्वसमावेशक विचार करून मंजूरीअंती कर्ज वितरण करणे बंधनकारक आहे. सदर कर्ज मंजूरी ही संस्थेच्या मंजुर पोटनियमातील तरतुदीनुसारच झालेली आहे किंवा कसे या अनुषंगाने कर्ज प्रकरणांचे चाचणी लेखापरीक्षण केले असता ते पोटनियमातील तरतुदीनुसार झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या., शिवज्योती कॉलनी, एन-6 सिडको, छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ-
(1) अंबादास आबाजी मानकापे, प्लॉट क्र. 31, शिवज्योती कॉलनी, एन-6, सिडको, छत्रपती संभाजीनगर (अध्यक्ष)
संचालक मंडळ सदस्य
(2) देशमुख महेंद्र जगदीश रा. प्लॉट क्र. 88, शिवानी, महाजन कॉलनी, एन-2, सिडको, छत्रपती संभाजीनगर,
(3) काकडे अशोक नारायण संचालक, मु. वडखा पो. वरझडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर.
(4) काकडे काकासाहेब लिंबाजी, मु. वडखा पो. वरझडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर.
(5) मोगल भाऊसाहेब मल्हारराव, मु. पो. निलजगाव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर.
(6) पठाडे त्रिंबक शेषराव मु. पो. वरझडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर,
(7) जाधव रामसिंग मानसिंग, मु. गिरनेरा तांडा पो. गेवराई ता. जि. छत्रपती संभाजीनगर,
8) दौलनपुरे गणेश ताराचंद, रणजितगड, सारा प्राईड, चेतना नगर, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर,
(9) मुन ललीता रमेश, मु. पो. एकोड पाचोड रोड, पो. भालगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर,
10) निर्मळ सपना संजय, एन-3, सी, रामनगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर.
(11) पाटील अनिल अंबादास, प्लॉट क्र. 31, शिवज्योती कॉलणी, एन-6, सिडको, छत्रपती संभाजीनगर,
(12) जैस्वाल प्रेमिलाबाई माणिकलाल, मु. आपतगाव पो. भालगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर, (अ. क्र. 2 ते 12 संचालक मंडळ सदस्य)
(13) मुख्य व्यवस्थापक देविदास सखाराम आधाने रा. प्लॉट क्र. 9 के सेक्टर, नवजीवन कॉलनी,
एन-11, हडको, राष्ट्रवादी भवन शेजारी, छत्रपती संभाजीनगर,
(14) संबंधीत शाखा प्रमुखांची नावे माहित नाही.
(15) कर्ज विभाग प्रमुख (नावे नाही) आणि
(16) संबंधीत कर्मचारी (नावे माहित नाही) यांनी तसेच

(17) एकूण (23) कर्जदार व त्यांचे जामीनदार यांनी कट रचून संगनमताने, जाणीवपूर्वक, विनातारणी कॅश क्रेडिट कर्ज वितरण करून संस्थेच्या निधीचा अपहार करण्याचे उद्देशाने गैरव्यवहार, बनावटगिरी, फसवणुक करून सभासद व ठेवीदारांचा विश्वासघात करणे अशा स्वरुपाचे एकमेकांशी कट कारस्थान रचून कर्ज वितरण केले आहे.

मार्च 2019 अखेरीस आलेली (23) कर्ज प्रकरणातील कागदपत्रे ही परिपूर्ण नसून अपूर्ण स्थितीतले अर्ज स्वीकारुन पोटनियमातील कर्ज वाटपाचे निकषाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करुन, विनातारण / कमी तारण स्वीकारून अत्यंत गंभीर त्रुटी असलेले अर्जाचे आधारे कर्ज वितरीत केले. सदर वितरीत केलेल्या कर्जास दि. 30 एप्रिल, 2019 रोजीच्या संचालक मंडळ सभेने देखील गंभीर त्रुटीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करुन ठेवीदारांनी संस्थेत ठेवलेल्या ठेव रकमेतून मोठ्या प्रमाणात कर्जाचे वितरण करण्याच्या कृतीस मान्यता दिली आहे.

एकूण 23 कर्जदारांनी ज्या उद्देशासाठी कर्ज घेतले त्यांनी त्याच उद्देशासाठी कर्जाचा विनियोग न करता रक्कम उचल केली आहे. दि. 31-3-2019 अखेरवर सदर 23 कर्ज प्रकरणांच्या अनुषंगाने अपहाराच्या उददेशाने करण्यात आलेल्या गैरव्यवहाराची एकूण कर्ज रक्कम रु.91,79,44,064/- इतकी आहे.

तसेच सन 2016 ते 2019 या आर्थिक वर्षात 12 संचालक व मुख्य व्यवस्थापक, संबंधीत शाखा प्रमुख, कर्ज विभाग प्रमुख व संबंधीत कर्मचारी यांनी ठेवीदारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने पोटनियमातील तरतुदीचे उल्लंघन केले. ठेव रकमेचा गैरव्यवहार करण्याचे उद्येशाने विनातारणी, अंशत: तारणी, वैयक्तीक व कॅश क्रेडीट कर्ज परतफेडीची क्षमता न पहाता वाटप केले.

1) सन 2016-17 मध्ये चाचणी लेखापरीक्षण अहवालात उल्लेखीत (पान क्र. 79 ते 81) येथे नमुद एकूण (04) कर्जदारांना कर्ज वाटप रक्कम रु.9500000/- इतकी असून या कर्जाची कमी प्रमाण वसुली होऊन दि. 31-3-2019 अखेरवर रु.8049329/- इतकी येणे थकबाकी आहे.

2) सन 2017-18 मध्ये चाचणी लेखापरीक्षण अहवालात उल्लेखीत (पान क्र. 82 ते 90) येथे नमुद एकूण (17) कर्जदारांना एकूण रु. 28000000/- इतकी असुन या कर्जाची कमी प्रमाणात वसुली होवुन दि. 31-03-2019 अखेरवर रु.26636386/- इतकी येणे थकबाकी आहे.

3) सन 2018-19 मध्ये चाचणी लेखापरीक्षण अहवालात उल्लेखीत (पान क्र. 90 ते 120) येथे नमुद एकूण (87) कर्जदारांना एकूण रु. 76229317/- इतकी असून या कर्जाची कमी प्रमाणात वसुली होवून दि. 31-03-2019 अखेरवर रु.73726057/- इतकी येणे थकबाकी आहे.

सदर तीन वर्षांतील एकूण (108) (04+17+87) कर्जदारांना कर्ज वितरीत करताना अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्य व्यवस्थापक व संबंधित शाखाधिकारी, संबंधित कर्मचारी यांनी बहुतांश कर्जदाराकडून अपूर्ण स्थितीतले कर्ज मागणी अर्ज स्वीकारुन, कर्जदारांच्या व्यवसायाचे ठिकाणाची प्रत्यक्ष पहाणी व पडताळणी न करून पहाणी अहवाल सादर करून पोटनियमानुसार सर्व तरतुदींचे तंतोतंत पालन केलेले नाही. बहुतांश कर्ज प्रकरणात तारण न स्वीकारता अथवा अल्प तारण घेवून केलेल्या कर्ज वाटपाच्या वसुलीसाठी भरीव प्रयत्न न करता कर्ज बुडीत व थकित होण्यास पर्यायाने ठेवीदारांच्या ठेवी बुडण्याच्या स्थितीत आणण्यास संबंधित जबाबदार आहेत.

अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्य व्यवस्थापक व संबंधित शाखाधिकारी, संबंधित कर्मचारी यांनी कर्जदारास आर्थिक लाभ पोहोचविणेसाठी संगणमत केलेले आहे असे दिसून येते. सदर प्रकरणी संबंधित 108 कर्जदारांचा सहभाग आहे किंवा कसे याचा देखील तपास होणे आवश्यक असल्याचे सहकारी संस्थेचे (ग्राहक) विशेष लेखापरीक्षक धनंजय हिरालाल चव्हाण (पत्ता बाळासाहेब पवार सहकार भवन, जुना मोंढा, जाफर गेट, छत्रपती संभाजीनगर) यांनी सिडको पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!