महाराष्ट्र
Trending

शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रकल्प प्रस्तावित ! दिवसापेक्षा रात्री वीज स्वस्त मिळत असल्याने वेगळ्या उपायाची चाचपणी !!

ट्रान्सफार्मर तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यात येणार- ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 15 : नादुरुस्त विद्युत ट्रान्सफर्मर तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, संजय कुटे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, प्राजक्त तनपुरे यांनी विजपुरवठया अभावी पीकांचे होत असलेले नुकसान याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

फडणवीस म्हणाले की, येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्हयात ट्रान्सफार्मरचा पूल तयार करण्यात येईल. आज प्रत्येक ठिकाणी ट्रान्सफार्मरवर लोड आल्याने ट्रान्सफॉर्मर जळत आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ट्रान्सफार्मरसाठी रिप्लेस आणि रिपेअर असे धोरण करण्यात येईल. यासाठी प्रत्येक तालुक्यात व्हेंडर बेस निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभागाची मदत घेण्यात येईल. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी सौर ऊर्जीकरणावर भर देण्यात येत असून याबाबत नुकतीच एक प्रीबीड बैठक झाली आहे. दिवसापेक्षा रात्री वीज स्वस्त मिळत असल्याने काही वेगळे उपाय करता येतील का, याबाबतही विचार करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प प्रस्तावित केले असून, सन 2025 पर्यंत 50 टक्के सौरऊर्जा फीडर प्रकल्पाचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांना वीज उपलब्धतेसाठी सौर ऊर्जेवरील प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. राज्यात सध्या 15 लाख 23 हजार 426 ग्राहकांनी आतापर्यंत एकही वीज देयक गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये भरलेले नाही. त्यांना थकीत देयके भरा अशा सूचना नाहीत तर चालू बील भरण्यासाठी विनंती करण्यात आली आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

रब्बी हंगामात कृषी वाहिन्यांमधील भार वाढून महत्तम मागणीच्या कालावधीत काही वेळेसाठी सदर वाहिन्या अतिभारीत होतात आणि तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होतो. सदर तांत्रिक बिघाड दूर करुन, नादुरुस्त रोहित्र बदली करुन वीज पुरवठा कमीत कमी वेळेत पूर्ववत करण्यात येतो. अजंग उपकेंद्राची स्थापित क्षमता 10 एमव्हीए असून तेथील अतिभारीत वाहिन्यांवरील भार कमी होण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS)अंतर्गत अतिरिक्त 5 एमव्हीए क्षमतेचे ऊर्जा रोहित्र बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!