छत्रपती संभाजीनगर
Trending

अजिंठा अर्बन बॅंकेतील संशयास्पद कागदपत्रे पोलिसांकडून जप्त, असुरक्षित कर्जदारांच्या काही फाईली गायब ? माजी आमदार तथा बॅंकेचे चेअरमन सुभाष झांबड फरार, पोलिस पथक मागावर !!

हजारो ठेवीदारांची दिवाळी अंधारात, ठेवीदार आंदोलनाच्या तयारीत, पोलिस आयुक्तांची घेणार भेट

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेतील ९७.४१ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अॅक्शन मोडवर काम करत असून पोलिसांनी बॅंकेतील संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार 36 कर्जधारकांना असुरक्षित कर्ज वाटप करण्यात आले असून या ३६ कर्जदारांपैकी केवळ १२ कर्जदारांच्या केवायसीच पोलिसांना मिळाल्या असून अन्य केवायसी उपलब्ध नसल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. कर्जदारांच्या या फाईलीचे संपूर्ण रेकॉर्ड मिळत नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. असुरक्षित कर्जदारांची KYC सदर्भातील संपूर्ण माहिती पोलिस शोधत आहे. दरम्यान, बॅंकेचे ठेवीदार लवकरच पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

यासंदर्भात अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे (वर्ग-1, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे. अजिंठा अर्बन बॅंकेत ९७.४१ कोटींचा महाघोटाळा काकडे यांनी उघडकीस आणला आहे. खोट्या तथा बनावट FD दाखवून ३६ जणांना कर्ज वाटप केल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे. चेअरमन सुभाष झाबंड, सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरें यांच्यासह त्या काळातील संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून हा घोटाळा केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरें या दोघांना अटक केलेली असून यातील मुख्य सूत्रधार चेअरमन सुभाष झांबड हे अद्याप फरार आहेत.

यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस पथक चेअरमन सुभाष झांबड यांच्या निवास्थानी जावून आले आहे परंतू ते तेथे मिळालेले नाही. त्यांच्या दरवाज्यावर नोटीस डकवण्यात आली असून तपासात सहकार्य करावे, अशा आशयाची ती नोटीस आहे. पोलिस पथक त्यांच्या मागावर असून योग्य ती कायदेशीर कारवाई सुरु असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची सखोल कार्यवाही करण्यात येत आहे. बॅंकेच्या सर्व शाखेत जावून पोलिसांनी दप्तर ताब्यात घेवून माहिती घेतली. याशिवाय कर्मचार्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. ज्या असुरक्षित कर्जदारांच्या KYC ची कागदपत्रे मिळत नाही त्या कागदपत्रांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली.

अजिंठा अर्बन बँकेतील ठेवीदारांनों घाबरू नका, ५ लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित ! बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांची स्पेशल मुलाखत !!

सहकारी पतसंस्था व नागरी बॅंकांचे एकापाठोपाठ घोटाळे समोर येत असून अजिंठा अर्बन बॅंकेत ९७.४१ कोटींचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. तत्पूर्वी RBI ने व्यवहारावर घातलेल्या निर्बंधामुळे खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, ठेवीदारांना क्लेमची रक्कम मिळेल. त्यामुळे कुठल्याही ठेवीदारांनी पॅनिक होवू नये. पाच लाखापर्यंतच्या ठेव रकमा सुरक्षित असून सर्व ठेवीदारांना त्या मिळतील, असा दिलासा अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांनी दिला आहे. यासंदर्भात संभाजीनगर लाईव्हचे मुख्य संपादक सुधीर जगदाळे यांनी काकडे यांची घेतलेली ही स्पेशल मुलाखत. साधारण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ५ लाखांपर्यंच्या ठेवीची रक्कम ठेवीदारांच्या खात्यात जमा होण्याची शक्यताही काकडे यांनी व्यक्त केली. त्या दृष्टीने बॅंकेचे कर्मचारी अहोरात्र, काम करत असल्याचेही ते म्हणाले.

13 तारखेलाच आपण सर्व प्रकारच्या ठेवीदारांचे क्लेम सादर केले- अजिंठा नागरी सहकारी बँकेला रिझर्व बँक ऑफ इंडिया नागपूर यांच्याकडून 28/8/2023 रोजी बँकेला AID (ऑल इन्क्लूजिव्ह डायरेक्शन) लागू करण्याबाबत पत्र दिलं. सदरचे डायरेक्शन हे 29/8/2023 पासून लागू करण्यात आलेले आहेत. आणि त्या तारखेपासून 45 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला सर्व ठेवीदारांचे मॅक्झिमम पाच लाखापर्यंतचे ठेव रक्कम हे DICGC कडे क्लेम स्वरूपात सादर करायचे होते. ही क्लेम करायची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर २०२३ होती. 13 तारखेलाच आपण सर्व प्रकारच्या ठेवी सर्व ज्यांचे विलिंगनेस आलेले असतील नसतील वगैरे अशा सर्व ठेवीदारांचे क्लेम आपण DICGC दिलेले आहेत.

DICGC यांच्याकडून ऑडिटर अपॉइंट केले जातील- क्लेम सादर केल्यानंतर आता DICGC यांच्याकडून ऑडिटर अपॉइंट केले जातील. साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये ऑडिटरची अपॉइंटमेंट झाल्यानंतर आपण जे DICGC कडे क्लेम सादर केलेले आहेत ते सर्व क्लेम त्यांच्याकडून व्हेरिफाय केले जातील. क्लेम व्हेरिफाय झाल्यानंतर ते परत DICGC कडे त्यांच्या ऑडिटर यांच्या मार्फत सबमिट केलं जातील. त्यानंतर अॅप्रुड झालेल्या क्लेमची रक्कम DICGC कडून रिलिज होतील. म्हणजे ठेवीदारांना क्लेमची रक्कम मिळेल. त्यामुळे कुठल्याही ठेवीदारांनी पॅनिक होवू नये. पाच लाखापर्यंतच्या ठेव रकमा सुरक्षित असून सर्व ठेवीदारांना त्या मिळतील.

पाच लाखांवरील ठेवीची रक्कम मिळण्याची अशी असेल प्रोसेस- पाच लाखापर्यंतचे सर्व क्लेम केल्यानंतर बँक कर्जदारांकडील रिकव्हरीची प्रोसेस सुरू करेल. म्हणजे ज्या कर्जदारांकडे थकीत असलेल्या कर्जाची रक्कम वसुल करणार. रिकवरीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा DICGC कडून जी क्लेम स्वरूपात रक्कम घेऊ ती रक्कम DICGCला  परत केल्यानंतर उर्वरित जी रक्कम शिल्लक राहणार आहे त्या पाच लाखांच्या वरील ठेवीदारांना परत केल्या जातील.

बॅंकेत एकूण 47 हजार अकाउंट, ३५० कोटींच्या ठेवी- साधारणत: प्राथमिक स्वरूपामध्ये 47 हजार अकाउंट आहेत. ३५० कोटी पर्यंतच्या एकूण ठेवी आहेत. ज्या तारखेला एआयडी लागलेला आहे. त्या तारखेची ही परिस्थीती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सेविंग अकाउंट मुदत ठेवी पुन:गुंतवणूक या सगळ्या प्रकारच्या ठेविचा त्यामध्ये समावेश आहे.

टप्प्या-टप्याने व पॅरलल यंत्रणा काम करतेय- सध्या रिकव्हरीचे टप्पे सुरुच होणार आहेत. आता पहिला टप्पा क्लेमचा आहे. त्यानंतर कर्जाची वसुली करणे आदी पॅरलल ही यंत्रणा सुरुच होणार आहे. अर्थात क्लेमचा पहिला टप्पा आता बॅंकेच्या बाजून अंतिम टप्प्यात असून तो DICGC कडे सादर करण्यात आलेला आहे.

प्रथम माहिती अहवालानुसार असे आहे बॅंकेतील घोटाळ्याचे स्वरुप

अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद चे 1) सुभाष मानकचंद झांबड, (चेअरमन), 2) प्रदीप एकनाथ कुलकर्णी (मुख्य कार्यकारी अधिकारी), 3) सतीश मोहरे (सनदी लेखापाल), आणि दिनांक 01/03/2006 रोजी 10.30ते दिनांक 30/08/2023 रोजी 5.30 या कालावधीतील संचालक मंडळ, अधिकरी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून कर्जदारांना विनातारण कर्ज दिले. तसेच खोट्या व बनावट नोंदी घेवून खोटा हिशेब तयार करून बँकेची सुमारे 97.41 कोटी रूपये रक्कमेचा अपहार करून आर्थिक फसवणुक केली असल्याचे सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. बँकेचे संचालक मंडळ, व बँकेचे इतर जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून ३६ कर्जदारांना विनातरण कर्ज वाटप केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!