महाराष्ट्र
Trending

अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्याचे निर्देश !

महिला व बालकांच्या आरोग्यासह शैक्षणिक विकासासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 17 : अनुसूचित क्षेत्रासह राज्यातील अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा पोषण आहार बालकांपर्यंत निश्चित प्रमाणात देण्यासंदर्भात तपासणी करावी. महिला व बालकांच्या आरोग्यासह शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणी संदर्भातील अहवाल सादर करावा. नवरात्री उत्सवात नऊ रंगाचे पोषण मूल्य असलेले आहार मुलांना देण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत करावयाच्या खर्च, जिल्हा परिषद ग्राम विकास विभागांतर्गत असणाऱ्या १० टक्के निधीबाबत निकष ठरविणे, बेटी बचाव-बेटी पढाओ, अमृत आहार योजना, नवरात्रीमध्ये नऊ रंगाच्या अनुषंगाने पोषण आहार, रक्षाबंधन निमित्त कार्यक्रमांचा आढावा घेण्यासंदर्भात आज मंत्रालयात मंत्री तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ.ए.पी.जे अमृत आहार योजनेअंतर्गत आदिवासी भागात तसेच, अंगणवाडीमध्ये पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत आहार दिला जातो. आहाराच्या ठरवून दिलेल्या मापदंडानुसार व नियमिततेसंदर्भात तपासणी करावी. नगरपालिकेच्या हद्दीतील अंगणवाडी नागरी अंगणवाडी म्हणून घोषीत करून, त्यांच्या देखभालीची जबाबदारी निश्चित करावी. विभागीय कार्यालयांवर सोलार पॅनल लावण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३ टक्के निधीव्यतिरिक्त अंगणवाडी बांधणे व दुरूस्ती करण्यासाठीच्या निधीबाबत प्रस्ताव सादर करावा. डॉ. अब्दुल कलाम योजनेंतर्गत येणाऱ्या ४२० अंगणवाडी केंद्रांना योजना शहरी भागात लागू करणेबाबत प्रस्ताव सादर करावा. तसेच अनुसूचित क्षेत्रात गर्भवती व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेणे, कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण कमी करणे, कुपोषण निर्मूलन, स्त्रियांमधील ऍनिमियाचे प्रमाण कमी करणे, बेटी बचाव बेटी पढाओ कार्यक्रम राबविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी दिल्या.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!