वैजापूर
Trending

पत्नीने पतीला विहिरीत ढकलून दिले, विहिरीच्या काठावरून दगडांचा मारा करून ठार केले ! खळबळजनक खूनाने वैजापूर तालुका हादरला, मारेकरी पत्नी जेरबंद !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १८- शेतीच्या हिश्श्यावरून पत्नीने पतीला विहिरीत ढकलून दिले. पती विहिरीच्या वर येण्याचा प्रयत्न करत असताना विहिरीच्या काठावर उभ्या असलेल्या पत्नीने पतीवर दगडांचा मारा करून पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. शिऊर पोलिसांनी ७२ तासांत या खूनाचे गूढ उकलून मारेकरी मृताच्या पत्नीला जेरबंद केले.

सुदाम राघु झिंजुर्डे (वय ७५ वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी कमलताई सुदाम झिजुर्डे (वय ४८ वर्षे रा. हिलालवाडी पारोळा शेतवस्ती, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हिला अटक केली आहे.

दिनांक १३/८/२०२३ रोजी सांयकाळी ६:३० वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे शिऊर हद्दीतील हिलालपूर पारोळा शिवारातील शेत गट क्रमांक २२८ मध्ये सुदाम राघु झिंजुर्डे (वय ७५ वर्षे) यांनी त्यांच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केल्या बाबत त्यांच्या पत्नी कमलाबाई सुदाम झिंजुर्डे यांनी शिऊर पोलीसांना माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीवरून लागलीच शिऊर पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप पाटील व त्यांचे पथकाने घटनास्थळी धाव घेवून विहीरीतून मृतदेह वरती काढून घटनास्थळाची सुक्ष्म बारकाईने पाहणी केली. यावेळी मृताची पत्नी कमलबाई झिंजुर्डे हिने तिचा पती सुदाम झिंजुर्डे याने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याबाबत पोलीसांना माहिती देली होती.

या घटनेच्या अनुषंगाने मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महक स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी, वैजापूर, व सपोनि संदीप पाटील यांनी मृत सुदाम झिंजुर्डे यांच्या आत्महत्येच्या घटनेच्या अनुषंगाने परिस्थीतीचा संशय आला. पोलीसांनी मृताची पत्नी कमलबाई झिजुर्डे हिची कसोशिने चौकशी करता ती पोलीसांना उडवा उडवीची उत्तरे देवू लागल्याने तिच्यावर अधिक संशय बळावला.

तिला विश्वासात घेवून सखोल चौकशी करता तिने सांगितले की, मृत सुदाम यांची पहिली पत्नी ही साधारण १५ वर्षांपूर्वी मृत झाली आहे आणि तिला दोन मुले आहेत. त्यामुळे त्याने त्यावेळेस कमलाबाईसोबत लग्न केले. परंतु तिला बऱ्याच कालावधी पर्यंत अपत्य न झाल्याने तिच्या पतीने त्यांची शेत जमीन ही पहिल्या पत्नीच्या मुलांच्या नावाने केली होती. परंतु यादरम्यान साधारण तीन ते चार वर्षांपूर्वी कमलबाई हिला सुध्दा मुलगी झाली. त्यामुळे तिने मृत सुदाम ह्याच्या मागे तगादा लावला की मला व माझ्या मुलीच्या भविष्यासाठी जमीन आमच्या नावावर पाहिजे. यावरून त्यांच्यात ब-याच वेळा भांडण होवून वाद होत होते. याबाबत कमलबाई हिच्या मनात कायम संशय आणि पती सुदाम यांचे विषयी रागाची भावना निर्माण झाली होती.

याच कारणावरून त्यांच्यात दिनांक १३/८/२०२३ रोजी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास वाद होवून मोठ्याप्रमाणावर भांडण झाले. भांडण करत करत ते त्यांच्या शेतवस्तीवरिल असलेल्या विहीरीजवळ गेले असता पत्नी कमलबाई हिला पती विषयी असलेला राग अनावर झाल्याने तिने पती सुदाम झिजुर्डे यांना विहीरीत ढकलून दिले. पती सुदाम हा विहीरीबाहेर येण्याचा अतोनात प्रयत्न करत असतांना तिने विहीरीच्या काठावर उभे राहुन पतीच्या अंगावर जोरात दगडांचा मारा करून त्यास विहिरीत ढकलून देवून दगड मारून ठार मारले. पतीने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा खोटा बनाव केला असा कबूली जबाब तिने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शिऊर पोलीसांनी अत्यंत कसोशिने शास्त्रशुध्द पध्दतीने तपास करून यातील मृताचे आत्महत्याचे गूढ उकलून काही तासातच आरोपी मृतांची पत्नी कमलताई सुदाम झिजुर्डे (वय ४८ वर्षे रा. हिलालवाडी पारोळा शेतवस्ती) हिला हत्येच्या आरोपाखाली जेरबंद केले आहे. तिच्या विरुध्द पोलीस ठाणे शिऊर येथे भादवी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापूर उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप पाटील, रामचंद्र जाधव, विशाल पैठणकर, किशोर आघाडे, सविता वरपे, श्रद्धा शेळके यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!