महाराष्ट्र
Trending

ग्रामसेवक एक लाखाची लाच घेताना पकडला ! चार लाख व साखरेच्या पोत्याची केली डिमांड !!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

बुलडाणा, दि. १ – विवाह नोंदणीची कागदपत्रे देण्यासाठी १ लाख १ हजाराची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी याला रंगेहात पकडण्यात आले. ४ लाख रुपये व एक साखरेचे पोते अशी डिमांड ग्रामसेवकाने केली होती. तडजोडीअंती १ लाख १ हजार घेतले.

रामकृष्ण गुलाबराव पवार (वय ५४ वर्षे, पद ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बोराखेडी वर्ग 3 ता. मोताळा जि. बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. चिखली रोडवरील नागरे ठेकेदार यांच्या बंगल्यासमोर असलेल्या गाळा क्रमांक ८, सुंदरखेड या परिसरात आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.

तक्रारदार यांनी तकार दिली की, ग्रामविकास अधिकारी पवार यांनी तक्रारदार यांना ग्रामपंचायत बोराखेडी येथे विवाह नोंदणी कोणत्या कागदपत्राच्या आधारे घेण्यात आली त्याबाबतची कागदपत्रे मिळण्याकरीता अर्ज दिला होता. ही माहीती पुरविण्यासाठी ग्रामविकास अधिकारी पवार यांनी तक्रारदार यांना पंचासमक्ष ४,००,०००/- रूपये व एक साखरेच्या पोत्याची मागणी करीत असल्याबाबत तकार प्राप्त झाली. पडताळणी कार्यवाही दरम्यान पंच क.१ यांच्या समक्ष तडजोडीअंती २०१०००/- रुपये व एक पोते साखर अशी लाचेची मागणी केली. पडताळणी दरम्यान तात्काळ १०००/- रुपये मोबाईलवर फोनपे व्दारे स्वीकारले. सापळा कार्यवाही दरम्यान उर्वरीत २,००,०००/- रुपये लाचेच्या रकमेपैकी पहीला टप्पा १,००,०००/- रुपये पंचासमक्ष लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी पवार यांना रंगेहात पकडण्यात आले.

रामकृष्ण गुलाबराव पवार (वय ५४ वर्षे, पद ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत बोराखेडी, वर्ग-३, ता. मोताळा जि. बुलडाणा रा. संत गाडगे नगर, चिखली रोड, बुलढाणा ता. जि. बुलढाणा) यांनी पदाचा गैरवापर करून १,०१,०००/- रुपये लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारल्याने त्यांच्या विरुध्द पोस्टे बुलडाणा शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, अरुण सावंत, अप्पर पोलीस अधिक्षक, देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधिक्षक संजय चौधरी, पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी सचिन इंगळे, पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यरो बुलडाणा व सापळा पथक एएसआय शाम भांगे, पोहेकॉ विलास साखरे, पोना. मोहम्मद रिजवान, प्रविण बैरागी, जगदिश पवार, विनोद लोखंडे, सुनिल राऊत, रविंद्र दळवी, मपोकॉ. स्वाती वाणी यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!