छत्रपती संभाजीनगरझेडपी
Trending

शिक्षकांचे बनावट नियुक्ती आदेश काढल्याने खळबळ ! जिल्हा परिषदेला बनावट कागदपत्रे पाठवल्या प्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५- शिक्षक व इतर कर्मचारी यांच्याकडून पैसे उकळून बनावट कागदपत्राआधारे approval काढण्यासाठी बनवलेले बनावट कागदपत्रे जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद खोकडपुरा यांना व प्रादेशिक उपायुक्त समाजकल्यान विभाग (छत्रपती संभाजीनगर) यांना पाठवले असल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कै.सोपानराव पाटील निवासी मुकबधीर विद्यालायाच्या मुख्याध्यावकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विद्यालयाचे कार्यालय पानदरीबा गुलजार टॉकीज समोर आहे.

गोरोबा मधुकर डावरे (मुख्याध्यापक, कै. सोपानराव पाटील निवासी मुकबधीर विद्यालय, रसुलपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमोल सुरेश आरके (शिक्षक, रा. जटवाडा रोड, होनाजीनगर, साई स्वरुप अपार्टमेंट, छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत नमूद केले आहे की, कै.सोपानराव पाटील निवासी मुकबधीर विद्यालाय रसुलपुरा या संस्थेमध्यें आरोपी मुख्याध्यावक गोरोबा मधुकर डावरे यांनी 1 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11.00 ते 30मे 2023 रोजी 18.00 पर्यंत मुख्याध्यापक असताना डावरे यांनी शिक्षकांचे बनावट नियुक्ती आदेश व इतर कागदपत्रे बनावट तयार केले.

या बनावट कागदपत्रा आधारे approval काढण्यासाठी शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या कडून संस्थाचालकांच्या नावे शिक्षकांकडून विश्वास संपादन करून पैसे घेतले. संस्थेचे काही बनावट ठराव तयार केले. शिक्षक व इतर कर्मचारी यांच्याकडून शासकीय काम करण्यासाठी बेकायदेशीर पणे विश्वास संपादन करून घेतलेले पैसे परत करण्यास नकार दिला. आरोपी मुख्याध्यापक डावरे यांनी बनवलेले बनावट कागदपत्रे जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद खोकडपुरा यांना व प्रादेशिक उपायुक्त समाजकल्यान विभाग (छत्रपती संभाजीनगर) यांना पाठवले.

याबाबत संस्थाचालकांना कोणतीही माहिती न देता परस्पर निर्णय घेऊन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संस्थाचालकांची देखील फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून आरोपी मुख्याध्यापक गोरोबा मधुकर डावरे यांच्यावर सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि लाड करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!