राजकारण
Trending

नऊशे वर्षे मुघलांची सत्ता असतानाही हिंदू धर्म देशात टिकला अन् वाढलाही, त्याकाळात कोणालाही हिंदू धर्म रक्षणासाठी मोर्चे काढावे लागले नाहीत: धनंजय मुंडेंचा भाजपावर हल्लाबोल

मुंबई, दि. २१ – आज जाती-जातीत, धर्मा-धर्मांत तेढ निर्माण केली जात आहे. सत्ताधाऱ्यांना खरच हिंदुत्वाचा कळवळा आहे का? नऊशे वर्ष मुघलांची सत्ता असतानाही हिंदू धर्म देशात टिकून राहिला आणि वाढला. त्याकाळात कोणालाही हिंदू धर्म रक्षणासाठी मोर्चे काढावे लागले नाहीत. आज मात्र दहा वर्षे हिंदू हित की बात करेगा, वही देश मे राज करेगा असे म्हणणारे सत्तेत असतानाही हिंदूंना स्वत:चे रक्षण करण्यासाठी मोर्चे काढावे लागत असतील तर या देशात नेमके कोण सुरक्षित आहे, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन १० जूनला होता, त्यानिमित्त अहमदनगर येथे मोठा कार्यक्रम आयोजित केला असताना नियतीच्या मनात काही वेगळे होते. १० जूनचा कार्यक्रम आज २१ जून रोजी आयोजित करण्याचा निर्णय झाला. वर्षभरातील सर्वात मोठा दिवस हा २१ जून आहे. या दिवशी आपण रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. जसा हा दिवस मोठा आहे त्याप्रमाणेच येणाऱ्या काळात सर्वात मोठा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरणार आहे, असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून दहा वर्षे केंद्रात आणि साडे सतरा वर्षे राज्यात सत्तेत राहिला आहे. याकाळात जे नेते घडले ते केवळ शरद पवार यांच्यामुळे घडले. पक्षाची स्थापना झाली तेव्हा राज्याची जबाबदारी भुजबळ तर केंद्राची जबाबदारी पवार संभाळत होते. पुढे स्व. आर. आर. पाटील, अरूण गुजराथी, सुनील तटकरे, जयंतराव पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. अजितदादांनी देखील भावाप्रमाणे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळले आहे.

महाराष्ट्रात तरूणांचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या पक्षात तरूणांना मोठी संधी आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून याचा मला अभिमान वाटतो. ज्या ज्या वेळी पवार यांचे समाजकारण आणि राजकारण पाहायला मिळते तेव्हा पवार हे सर्व क्षेत्रातील विश्व विद्यापीठ आहेत याची प्रचिती येते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे स्वराज्य होते. त्या रयतेच्या राजाला अभिप्रेत असणारे समाजकारण आणि राजकारण करणे सोपे नाही. पण पवार यांनी महिलांना, सर्व घटकांना सन्मान दिला आहे. देशात सर्वप्रथम मंडल आयोग पवार यांनी स्वीकारला. आम्ही कधी मंत्री होऊ अशी महत्त्वाकांक्षा ठेवली नाही. मात्र ही संधी पवार यांनी आम्हाला दिली.

आपल्यासमोर हजार संकटे आहेत. सध्या सोशल मीडियावर न्यूज अरेना इंडियाचे सर्वेक्षण चर्चेत आहे. न्यूज अरेना इंडिया हे भारतीय जनता पक्षाचे असून त्यामार्फत पायात साप सोडण्याचे काम होत आहे. या सर्वेक्षणात काही तथ्य नाही, अशी टीकाही मुंडे यांनी केली.

आज जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. सत्ताधाऱ्यांना खरच हिंदुत्वाचा कळवळा आहे का? नऊशे वर्ष मुघलांची सत्ता असतानाही हिंदू धर्म देशात टिकून राहिला आणि वाढला. त्याकाळात कोणालाही हिंदू धर्म रक्षणासाठी मोर्चे काढावे लागले नाहीत. आज मात्र दहा वर्षे हिंदू हित की बात करेगा, वही देश मे राज करेगा असे म्हणणारे सत्तेत असतानाही हिंदूंना स्वत:चे रक्षण करण्यासाठी मोर्चे काढावे लागत असतील तर या देशात नेमके कोण सुरक्षित आहे, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

आज वर्धापन दिन कार्यक्रमाच्या दिवशी आपण शपथ घेऊ की येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा पक्ष करून आपला मुख्यमंत्री राज्यात बसलेला असेल, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

Back to top button
error: Content is protected !!