महाराष्ट्र
Trending

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे अनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन !

मुंबई,दि.28 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, या संस्थेच्या अनुदान आणि बीजभांडवल योजनेच्या अनुदानासाठी चर्मकार समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. या योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात.  सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना आणि  बीजभांडवल योजना कर्ज प्रस्तावाचे अर्ज 9 मार्च 2023 पर्यंत वाटप करण्यात येणार आहेत. तसेच अर्ज स्विकृती कार्यालयीन वेळेत करण्यात येईल,  इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

चर्मकार समाजांतर्गत असणाऱ्या चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमांप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन तीन प्रतीत महामंडळाच्या कार्यालयात स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून अर्ज दाखल करावेत. त्रयस्थ अथवा मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. यात जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा)., अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला, चालू वर्षाचा (तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा), नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटो तीन प्रती जोडाव्यात, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रेशनकार्ड झेरॉक्स प्रत, ओळखपत्र-आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड प्रत, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन)., व्यवसाय ज्या ठिकाणी करायचे आहे त्या जागेची भाडेपावती/करारपत्रे किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं. 8), वीजबिल, टॅक्स पावती इ, बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल व दोन सक्षम जामीनदार, वाहनासाठी लायसन्स, बॅच परवाना, व्यवसायाचे ग्रा.पं./न.पा. यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायाचे तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्रावरील कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करुन घोषणापत्र देण्यात यावे.

कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, गव्हर्नमेंट लेदर वर्किंर्ग स्कूल कंपाऊंड, खेरवाडी, बांद्रा (पूर्व), मुंबई-400 051 या ठिकाणी स्विकारले जातील. मुंबई शहर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील बेरोजगार युवक युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी   जिल्हा व्यवस्थापक, मुंबई शहर  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!