महाराष्ट्र
Trending

जालन्यात पोलिसांचा आंदोलकांवर पुन्हा लाठीचार्ज, जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या ! अंबड चौफुलीवर आंदोलक आक्रमक, दगडफेक, गाड्यांची जाळपोळ !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २- मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे काल उपोषणादरम्यान पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचे आज, २ सप्टेंबर रोजी राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जालन्यात आजचे आंदोलन पुन्हा पेटले.

अंबड चौफुलीवर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे आंदोलक आक्रमक झाले. गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आज पुन्हा लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना परिसरातील तगडा पोलिस बंदोबस्त हा सुरक्षेसाठी होता की लाठीचार्ज करण्यासाठी ? असा सवाल उपस्थित करून आंदोलकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. पोलिसांच्या या कडक कारवाईमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आठ ते नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. मराठा क्रांती मोर्चा तर्फे दि. 2 सप्टेंबर रोजी जालना शहरातील अंबड चौफुली येथे आंदोलनं करण्यात आले. या वेळी रस्ता रोको सुरू असताना आंदोलनकर्त्यांच्या वतीने एक मराठा लाख मराठा, हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे असी जोरदार घोषणाबाजी सुरु होती.

दरम्यान, एका ट्रकला पेटवून देण्यात आले. दगडफेक करण्यात आली. रास्तोरोको प्रसंगी उडालेला गोंधळ लक्षात घेऊन जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आज पुन्हा लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यादरम्यान पोलिसांनी 8 ते 9 जणांना ताब्यात घेतले आहे. कोणीही कायदा हातात घेवू नये असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!