कन्नडछत्रपती संभाजीनगरफुलंब्री
Trending

फुलंब्री तालुक्यातील निधोन्यात महिलेचा गळा दाबून खून ! कन्नड तालुक्यातील बहिरगांवचा आरोपी सहा तासांत जेरबंद !!

पोलिस ठाणे वडोदबाजार हद्यीतील महिलेच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून सहा तासांच्या आत उघड

Story Highlights
  • कर्ज फेडीसाठी दागिण्याच्या मोहापायी दाबला ओळखीच्या महिलेचा गळा

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – व्याजाने घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचने असलेल्या व्यक्तीने सैतानी डोके चालवले. ओळखीच्या महिलेच्या घरी मुक्कामाला जावून त्या महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे आज, १० मार्च रोजी घडली. त्या महिलेचे दागिणे विकून कर्ज फेडण्याचा मनसुबा मात्र पोलिसांनी अवघ्या सहा तासांतच हाणून पाडला. खून झाल्यानंतर आरोपीला कन्नड तालुक्यातील बहिरगांव येथून ताब्यात घेण्यात आले असून त्याने खूनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. छत्रपती संभाजी नगर पोलीस ठाणे वडोदबाजार हद्यीतील महिलेच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून सहा तासांच्या आत उघड केला.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज दिनांक १०/०३/२०२३ रोजी पोलीस ठाणे वडोदबाजार येथे निधोना (ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर) येथील पोलीस पाटील सांडू भाऊराव राऊतराय यांनी खबर दिली की, त्यांच्या गावांतील महिला मंदाबाई बाबासाहेब राऊतराय (वय ४५ वर्षे रा. निधोना ता. फुलंब्री) ही तिच्या राहत्या घराच्या बाथरुम मध्ये मृतावस्थेत पडलेली आहे. त्यावरून पोलीस ठाणे वडोदबाजार येथे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करीत असताना घटनास्थळाच्या परिस्थितीचे बारकाईने अवलोकन करण्यात आले. मृत महिला मंदाबाई बाबासाहेब राऊतराय यांचा मृत्यू हा आकस्मित नसून त्यांची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना आला. त्या दृष्टीने तपास करीत असताना पोलिसांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रीक विश्लेषनावरून खात्रीलायक माहिती मिळाली की, बाळू कारभारी दापके (रा. बहिरगांव ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) याने अज्ञात कारणावरून खून केला आहे.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाळू कारभारी दापके याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो मृत मंदाबाई राऊतराय हिला ओळखत असून नेहमी तिच्या राहते घरी मौजे निधोना येथे भेटण्यासाठी येत-जात होता. तसेच त्याने त्याचे ओळखीच्या व्यक्तीकडून ५०,०००/- रुपये व्याजाने घेतलेले होते. तसेच इतर लोकांचे त्याचेवर कर्ज होते हे सर्व कर्ज फेडण्यासाठी मंदाबाई राऊतराय यांचा खून करून त्यांच्या जवळील दागिणे विक्री करून पैसे परत देता येईल या उद्देशाने तो काल दिनांक ०९/०३/२०२३ रोजी नेहमीप्रमाणे मृत मंदाबाई यांना भेटण्यासाठी गेला आणि रात्रभर त्यांच्याकडेच मुक्कामी राहिला.

पहाटे ०४:३० वाजेच्या सुमारास त्याने मंदाबाई राऊतराय यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली त्याने दिली. त्यावरुन आरोपीस सदर गुन्हयाच्या पुढील तपासकामी पोलीस ठाणे वडोदबाजार यांच्या ताब्यात दिले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे वडोदबाजार करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक, सुनिल लांजेवार, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, ग्रामीण जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस उप निरीक्षक विजय जाधव, प्रदीप डूबे, सफौ गजानन लहासे, बालू पाथ्रीकर, पोहेकॉ नामदेव सिरसाठ, पोना नरेंद्र खंदारे, पोकॉ ज्ञानेश्वर मेटे, संजय तांदळे, संतोष डमाळे, योगेश तरमळे, जीवन घोलप यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!