राजकारण
Trending

अजितदादा समर्थकांनी दोन दिवसांत दोन वेळा घेतली शरद पवारांची भेट ! कालही ऐकून घेतले, आजही फक्त ऐकूनच घेतले; प्रफुल पटेल म्हणाले, त्यांच्या मनात काय आहे हे मी कसं सांगू शकतो ?

पक्ष एकसंघ रहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा; कालही, आजही तीच विनंती पवारसाहेबांकडे केली - प्रफुल पटेल

Story Highlights
  • आमदारांनी आशीर्वाद घेतल्यानंतर पवारसाहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं...

मुंबई दि. १७ जुलै – पक्ष एकसंघ रहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा अशी विनंती कालही आणि आजही केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, काल मंत्री तर आज आमदारांनी भेट घेतली. मात्र, शरद पवार आपल्या भूमीकेवर ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, यावर शरद पवार ठाम आहेत. त्यामुळे अजित पवार समर्थकांचे प्रयत्न दुसर्या दिवशीही समशेल फेल ठरल्याचे दिसते.

प्रफुल पटेल म्हणाले की, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी काल (रविवारी) आम्ही शरद पवारसाहेब यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो होतो. काल (रविवारी) सगळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून बरेच आमदार उपस्थित झाले. त्यामुळे आज आदरणीय शरद पवारसाहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला उपस्थित आहेत हे समजल्यावर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आणि प्रत्येक आमदारांनी पवारसाहेबांचे आशीर्वाद घेतले असेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.

रविवारी पवारसाहेबांनी जसं आमचं ऐकून घेतलं तसं आजही ऐकून घेतलं. त्यांच्या मनात काय आहे हे मी कसे सांगू शकतो. मात्र आमचं म्हणणं ऐकून घेतलं हेही आवर्जून प्रफुल पटेल यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!