महाराष्ट्र
Trending

अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अथवा कंटेनर अंगणवाडी उपलब्ध करून देण्याचे आदेश !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १६० तक्रारींचे निराकरण

Story Highlights
  • महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार

मुंबई -: जी उत्तर वॉर्ड येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात दाखल झालेल्या तक्रारींपैकी १६० तक्रारींचे तत्काळ निराकरण महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. तसेच माहिम कापडबाजार, ढाणागल्ली येथील अंगणवाडीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अथवा कंटेनर अंगणवाडी उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी यंत्रणांना दिले.

दादर येथील मुंबई महापालिकेच्या जी उत्तर वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महानगपालिकेचे परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, मुंबई उपनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक यासह अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की, सन २००७ पासून माहिम येथील कापडबाजार, ढाणागल्ली येथे असलेल्या अंगणवाडीसाठी जागेची दीर्घ कालावधीपासूनची मागणी लक्षात घेता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी निर्देशित केले.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जी उत्तर वॉर्ड येथे बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली.

भायखळा ई वॉर्ड येथे गुरूवार दिनांक २८ एप्रिल रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी तीन ते ५.३० या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते.

Back to top button
error: Content is protected !!