छत्रपती संभाजीनगरफुलंब्री
Trending

समृद्धी महामार्गावरील सावंगी बोगद्याजवळ हवेत गोळीबाराच्या स्टंटबाजीचा गोप्यस्फोट ! मुलांच्या खेळण्यातील प्लास्टिकच्या बंदुकीला स्पेशल इफेक्ट देऊन व्हिडियो व्हायरल केला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – नुकत्याच लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावरील सावंगी बोगद्याजवळ हवेत गोळीबार केल्याचा व्हिडियो व्हायरल झाला होता. याचा पोलिसांनी कसून तपास केला. हा व्हिडीओ बनविण्याकरिता मुलांच्या खेळण्यातील प्लास्टिकची खेळणीतील बंदुक वापरल्याची कबुली आरोपीने दिली. व्हिडीओ एडिटिंग करणा-या मित्राच्या साहय्याने त्या व्हिडीओतील अग्नीशस्त्राला स्पेशल इफेक्ट व साऊंड देवून बनविला असल्याचे आरोपीने कबुल केले.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 14/12/2022 रोजी पोलीस ठाणे फुलंब्री अंतर्गत येणा-या समृध्दी महामार्गावरिल बोगद्याजवळ रोजी एका जणाने त्याच्या चारचाकी वाहनाच्या समोर येते त्याच्या जवळील अनाधिकृतपणे बेकायदेशिर बाळगत असलेल्या अग्नीशस्त्रातून (बंदूक) हवेत फायरिंग करून दहशत पसरवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या व्हिडीओच्या अनुषंगाने त्याच्या विरुध्द पोलीस ठाणे फुलंब्री येथे गुरंन 390/22 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी सदर घटनेची गांर्भीयाने दखल घेवून व्हिडीओतील व्यक्ती व त्याने वापरलेले शस्त्र यांचा शोध घेण्याची सूचना फुलंब्री व स्था.गु.शा चे पोलीस पथकांना दिल्या. यावरून पोलीसांची पथके व्हिडीओतील व्यक्तीचा शोध घेत असताना त्याच्या बाबत गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती  मिळाल्याने त्यास दिनांक 16/12/2022 रोजी फुलंब्री पोलीसांच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. विश्वासात घेवून विचारपूस करता त्यांने त्याचे नाव चंद्रकांत कैलास गायकवाड उर्फ बाळु गायकवाड (वय 30 वर्षे रा. बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर) असून त्यांने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या त्याच्या व्हिडीओतील अग्नीशस्त्रा बाबत सखोल चौकशी केली. त्याने हा व्हिडीओ बनविण्याकरिता मुलांच्या खेळण्यातील प्लास्टिकची खेळणीतील बंदुक वापरल्याचे सांगून व्हिडीओ एडिटिंग करणा-या मित्राच्या साहय्याने त्या व्हिडीओतील अग्नीशस्त्राला स्पेशल इफेक्ट व साऊंड देवून बनविला असल्याचे कबुल केले.

यावरून व्हिडीओ एडिटिंग करणा-या त्याच्या मित्राची तपास पथकाने कसून चौकशी करता,  त्याने आरोपीच्या व्हिडीओला स्पेशल इफेक्ट व साऊंड देवून तयार केल्याचे मान्य करून मुळ व्हिडीओतील बदलांचे प्रात्यक्षिक पोलिसांना करून दाखवले. यातील व्हिडीओतील वापरलेली अग्नीशस्त्रांची सत्यता तपासली असता त्यांने व्हिडीओमध्ये वापरलेली बंदुक ही मुलांचे खेळण्यातील असून, व्हिडीओला स्पेशल इफेक्ट व साउंड देवून बनविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांनी आवाहन केले आहे की, अशा प्रकारे सोशल मीडियावर स्टंटबाजी करून, धोकादायक शस्त्रांसह फोटो काढून, समाजात दहशत पसरविणा-या विरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. युवकांनी अशा प्रकारची स्टंटबाजी करू नये. प्राणघातक शस्त्रांसह सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणारी कृत्ये करून त्याचे व्हिडीओ, फोटो, सोशल मीडियावर व्हायरल करु नये. अशा प्रकारचे कृत्य करणा-या व्यक्तीवर सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा यांची विशेष नजर असून अशा व्यक्तींला सक्त व कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

या गुन्हयांचा तपास मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, औरंगाबाद उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे, श्रीनिवास धुळे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार आनंद पांचगे, कौतिक चव्हाण, साळवे  यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!