महाराष्ट्र
Trending

राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या चिंताजनक, कायदा व सुव्यस्थेचा उडाला बोजवारा !

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी साधला सरकारवर निशाणा

मुंबई, दि. १८ – महाराष्ट्र राज्य हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारे राज्य असून मागील कित्येक वर्षांच्या राज्य सरकारच्या कारभारातून सिध्द झाले आहे. राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या ही चिंताजनक बाब असल्याचे म्हणत विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका करत सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहेत. तर जानेवारी ते मार्च २०२३ राज्यातून सुमारे ५५१० मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. जानेवारी २०२३ या महिन्यात १६०० मुली तर फेब्रुवारी महिन्यात १८१० तर मार्च महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली व महिला यांचे प्रमाण वाढत आहे. सदर बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी चिंताजनक असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

महाराष्ट्र हे महिलांच्या सुरक्षेसाठी अग्रगण्य असलेले राज्य म्हणून गणले जाते. अशा राज्यात मुलीच महिला सुरक्षित नसतील तर सदर बाब राज्यासाठी चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली.

या प्रकरणी योग्य ती पावले उचलून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी सूचना दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बाल विकास मंत्री यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

ब्रेकिंग न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर लाईव्ह गुगल अ‍ॅप इन्स्टॉल करा

Back to top button
error: Content is protected !!