महाराष्ट्र
Trending

सरपंचाने शिपायाकडून ५० हजारांची लाच घेतली ! ग्रामसेविकेसह तिघांवर गुन्हा दाखल !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – राहणीमान भत्त्याच्या रकमेचा धनादेश बनवून देण्यासाठी शिपायाकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच व एजंटाला रंगेहात पकडण्यात आले. ग्रामसेविकेने यास प्रोत्साहन दिले. याप्रकरणी बलायदुरी ग्रामपंचायतच्या (ता. इगतपुरी, जि. नाशिक) सरपंच, ग्रामसेविकेसह एका एजंटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशा देवराम गोडसे (ग्रामसेविका, बलायदुरी ग्रामपंचायत, ता. इगतपुरी, जि. नाशिक), हिरामण पांडुरंग दुभाषे (सरपंच बलायदुरी ग्रामपंचायत, ता. इगतपुरी, जि. नाशिक), मल्हारी पंढरीनाथ गटकळ (रा. बलायदुरी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणातील तक्रारदार हे ग्रामपंचायत बलायदुरी येथे शिपाई म्हणून नेमणुकीस होते. ते माहे जून – २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले असून त्यांचे बलायदुरी ग्रामपंचायत येथे १६४,६८२/- रुपये राहणीमान भत्ता बिलाची रक्कम मिळणे बाकी होती. सदर राहणीमान भत्त्याच्या रक्कमेचा धनादेश बनवून देणेकामी ग्रामसेविका आशा देवराम गोडसे, सरपंच हिरामण पांडुरंग दुभाषे यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली.

या तक्रारीवरुन ला. प्र. वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला. सापळा कारवाई दरम्यान सरपंच हिरामण पांडुरंग दुभाषे व मल्हारी पंढरीनाथ गटकळ यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रूपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम देण्यासठी ग्रामसेविका आशा देवराम गोडसे यांनी प्रोत्साहन दिले असून हिरामण पांडुरंग दुभाषे (सरपंच बलायदुरी ग्रामपंचायत, ता. इगतपुरी, जि. नाशिक), मल्हारी पंढरीनाथ गटकळ (रा. बलायदुरी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) या दोघांनी मागणी केलेली सदर लाचेची रक्कम दि. ७.२.२०२३ रोजी घोटी येथील जुना मुंबई – आग्रारोड वरील आर. के. टायर सर्व्हिस दुकानासमोर तक्रारदार यांचेकडून स्वीकारली.

त्यांना पकडण्यात आले असून तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ, १२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!