महाराष्ट्र
Trending

जालना जिल्ह्यात एकाच दिवशी रोखले दोन बालविवाह ! परतूर व जाफराबाद तालुक्यात बाल संरक्षण कक्ष आणि ग्रामसेवकांनी निभावली सामाजिक जबाबदारी !!

जालना, दि. 16 – बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे परतूर व जाफ्राबाद तालुक्यात आज दोन बालविवाह रोखण्यात आले. प्रशासनाने सामाजिक जबाबदारी निभावली.

चाईल्ड लाईन 1098 कडून प्राप्त माहितीनुसार आज परतूर तालुक्यात (कनकवाडी तांडा) एक व जाफ्राबाद तालुक्यात (म्हसरुळ) एक बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. याबाबतची तात्काळ दखल घेऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, पोलिस प्रशासन यांना कळविले.

दोन्ही प्रकरणाची वयाची खात्री केली असता एका बलिकेचे वय 16 वर्षे व एका बालिकेचे वय 14 वर्षे असल्याचे निर्देशनास आले. यावेळी ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तसेच गाव बाल संरक्षण समिती यांनी सदर कुटुंबाची भेट घेऊन बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे, याबाबत सदर कुटुंबाचे समुपदेशन केले तसेच बालविवाह करण्यापासून सदर कुटुंबाला परावर्तित करण्यात आले.

अठरा वर्षे होईपर्यंत मुलीचे लग्न होणार नाही, अशा प्रकारची समज कुटुंबाला देण्यात आली. तसेच दोन्ही मुलींना व त्यांच्या आई वडील यांच्यासह बाल कल्याण समिती समक्ष हजर करण्यात आले. बालकल्याण समितीने सदर कुटुंबाचे समुपदेशन करून बालविवाह करणार नाही याबाबतची हमीपत्र लिहून घेतले.

सदर कारवाई बाल कल्याण समिती अध्यक्ष एकनाथ राऊत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण, समुपदेशक सुरेखा सातपुते, संबंधित ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, गाव बाल संरक्षण समिती आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!