छत्रपती संभाजीनगरझेडपीमहाराष्ट्र
Trending

DCPS धारक शिक्षकांच्या सद्यस्थितीत बुडवलेल्या सुमारे २५ कोटींच्या व्याजाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने राज्यस्तरावर मागवले मार्गदर्शन!

शिक्षक सेना अंगीकृत जुनी पेन्शन हक्क लढा सेनेच्या सातत्यपूर्ण निर्भीड पाठपुराव्याचे यश!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – DCPS धारक शिक्षकांच्या सद्यस्थितीत बुडवलेल्या सुमारे २५ कोटींच्या व्याजाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने राज्यस्तरावर मार्गदर्शन मागवले असल्याची माहिती शिक्षक सेना अंगीकृत जुनी पेन्शन हक्क लढा सेनेच्या वतीने देण्यात आली.

यासंदर्भात जुनी पेन्शन हक्क लढा सेनेने सांगितले की, जिल्हा परिषद वित्त विभागास राज्य शासनाकडून मार्च २०२१ पर्यंत हिशोब पूर्ण करून जमा रक्कमा तात्काळ एनपीएस खात्यात वर्ग करण्याच्या सूचना असतानाही वित्त विभागातील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षकांच्या हिशोबाच्या पावत्या जुळवायला दिलेल्या मुदतीपेक्षाही पावणे दोन वर्ष अधिकची लागले यातील धक्कादायक बाब म्हणजे, या दरम्यानच्या पाऊणे दोन वर्षांचे व्याज मात्र वित्त विभागाने बुडवत प्रत्येकी सुमारे ७० हजार ते एक लाख रुपये नुकसान करत सुमारे २५ कोटींचे व्याज बुडवत मार्च २०२१ अखेरची रक्कम प्रत्यक्षात थेट जानेवारी २०२३ मध्ये NPS खात्यात जमा केली. त्यामुळे निष्पाप शिक्षकांना ना या कालावधीचे व्याज मिळाले ना एनपीएस मध्ये रिटर्न्स!

त्यामुळे निर्दोष शिक्षकांना हक्काचे व्याज मिळवून देण्यासाठी मागील ५ महिन्यांपासून शिक्षक सेनेची घटक संघटना असलेली जुनी पेन्शन हक्क लढा सेना अथक पाठपुरावा करत आहे. जुनी पेन्शन हक्क लढा सेनेच्या माध्यमातून राज्यस्तरावर देखील याबाबत कायदेशीर पत्रव्यवहार सुरूच ठेवण्यात आला होता!

दरम्यान पालकमंत्री संदिपान पाटील भुमरे यांनाही या परिस्थितीची माहिती देऊन झालेल्या प्रकाराबद्दल अवगत केले असता त्यांनीही तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ही बाब समजून घेऊन यावर मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात मुख्य लेखा व वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी, जुनी पेन्शन हक्क लढा सेनेचे व इतर प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली होती. या बैठकीत जुनी पेन्शन हक्क लढा सेनेच्या वतीने प्रखरपणे बाजू मांडत कसे नुकसान होत आहे व यास प्रशासनच कसे कारणीभूत आहे, हे पुराव्यानिशी स्पष्ट करण्यात आले. अखेरीस इतके दिवस असे कुठलेही नुकसान होत नाही, शिक्षक सेना खोडसाळपणे तक्रार करत आहे… वगैरे वगैरे सांगून हात झटकु पाहणाऱ्या प्रशासनाने या बैठकीतून शिक्षकांचे खरंच व्याजाचे नुकसान होत आहे, हे मान्य केले.

याच बैठकीअंती सर्व चर्चेचा तोडगा म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिला की, पुढील काळाबाबतच्या व्याजाबाबत राज्यस्तरावर लेखी मार्गदर्शन मागविण्यात यावे. तसेच याबाबत वारंवार पाठपुरावा देखील करण्यात यावा,असे निर्देश दिले होते. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी जुनी पेन्शन हक्क लढा सेनेच्या मागणीच्या संदर्भाने मंत्रालय स्तरावर याबाबतचे लेखी स्वरूपात मार्गदर्शन मागविले आहे.

येणाऱ्या काळात प्रशासनासह जुनी पेन्शन हक्क लढा सेनेच्या वतीने देखील याचा जोरदार पाठपुरावा करण्यात येऊन केवळ औरंगाबाद जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्व जिल्ह्यांबाबत अशाच प्रकारे पाठपुरावा सुरू ठेवला जाणार आहे. तसेच इतर विविध विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत देखील बऱ्याच ठिकाणी ही समस्या असल्याने याबाबतही येणाऱ्या काळात जोरदार पाठपुरावा केला जाणार आहे.

जोपर्यंत संपूर्ण व्याजाचे हक्काचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्याने अथक प्रयत्न सुरूच राहणार आहेत. या बैठकीसाठी जुनी पेन्शन हक्क लढा सेनेच्या वतीने राज्य समन्वयक दीपकदादा पवार, मराठवाडा विभाग समन्वयक सोमनाथराव जगदाळे, जिल्हा समन्वयक अमोलराजे एरंडे, प्रसिद्धीप्रमुख महेश लबडे, तालुकाप्रमुख सचिनराव वाघ यांनी उपस्थित राहून सर्व बाबी सविस्तरपणे व निर्भीडपणे मांडल्या होत्या. तसेच येणाऱ्या काळात देखील जुनी पेन्शनची सर्व टीम संपूर्ण ताकतीने प्रयत्नशील राहील, असेही जुनी पेन्शन हक्क लढा सेनेने सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!