महाराष्ट्र
Trending

के. जे. सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थी मारहाण प्रकरणी कारवाई करणार !

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 2 : “के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनांच्या शिबिरासाठी गेले असता प्राध्यापकाने मारहाण केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी पूर्ण करून दोषींवर कार्यवाही करण्यात येईल,” असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

विधानसभा सदस्य सर्वश्री छगन भुजबळ, ॲड. आशिष शेलार, धनंजय मुंडे यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले की, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाच्या तीन सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. तसेच या प्राध्यापकावर व्यवस्थापन समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कार्यवाही यापूर्वीच करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यापीठाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!