छत्रपती संभाजीनगर
Trending

जाधववाडीतील व्यापाऱ्यास कॅबिनमध्ये कोंडून लुटले ! चाकूचा धाक दाखवून नऊ हिऱ्यांची अंगठीसह साडेचार लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २- कालचा आणि आजचा जमा झालेला गल्ला मोजत असताना दोन चोरटे कॅबिनमध्ये शिरले आणि चाकूचा धाक दाखवून चार लाख ४० हजारांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी जातांना व्यापाऱ्यास कॅबिनमध्ये कोंडले, लाईट, सीसीटीव्ही बंद करून पसार झाले. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडीत घडली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

राजेश लक्ष्मीदास ठक्कर (वय 51 वर्षे धंदा व्यापार रा. प्लॉट नं 289 नुतनकुंज, समर्थनगर छत्रपती संभाजीनगर) यांचे जाधववाडी भाजीमंडई येथे प्लॉस्टीकच्या बारदानचे दुकान (नं 53) आहे. दि. 01/03/2023 रोजी दुपारी 03.10 वाजे सुमारास व्यापारी राजेश लक्ष्मीदास ठक्कर त्यांच्या दुकानातील कॅबीनचा दरवाजा लावून आतमध्ये एकटे बसून काल विकलेल्या मालाचा गल्ला अंदाजे 60,000/- रुपये व आजचा गल्ला अंदाजे 45,000/- रुपये हे मोजत होते.

याचवेळी कोणीतरी कॅबीनचा दरवाजा वाजवला. त्यापूर्वी एक कस्टमर येवून गेल्याने तोच कस्टमर परत आला असेल म्हणून व्यापारी राजेश लक्ष्मीदास ठक्कर यांनी कॅबिनचा दरवाजा अर्धवट उघडला असता दोन अनोळखी होते. ते आतमध्ये आले व व्यापारी राजेश लक्ष्मीदास ठक्कर यांना म्हणाले की “धागा बंडल दया” धागा बंडल टेबलखाली ठेवलेले असल्याने ते घेण्यासाठी व्यापारी राजेश लक्ष्मीदास ठक्कर हे खाली वाकले तेव्हा त्या दोघांनी त्यांच्या हातातील मोठे चाकू काढून त्यांना त्याचा धाक दाखवला व शिवीगाळ केली.

त्यानंतर त्यांनी व्यापारी राजेश लक्ष्मीदास ठक्कर यांना मारहाण करून ढकलून दिले व म्हणाले की कोने में बैठ. त्यानंतर त्यांनी गल्ल्यातून संपूर्ण पैसे घेतले व त्यानंतर व्यापारी राजेश लक्ष्मीदास ठक्कर यांच्या हातातील नऊ हि-यांची सोन्याची अंगठी, गुरु ग्रहाची सोन्याची अंगठी व हातातील सोन्याचे ब्रेसलेट काढुन घेतले. मोबाईलही त्यांनी घेतला व दुकानातील सर्व लाईटस, CCTV कॅमेरे बंद केले त्यानंतर दुकानाचे कॅबिन बाहेरून लॉक करून मोबाईल दुकानात जमिनीवर फेकला व पसार झाले.

याप्रकरणी व्यापारी राजेश लक्ष्मीदास ठक्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!