महाराष्ट्र
Trending

दिव्यांगांसाठी नवीन शिधापत्रिका, महिन्याला 35 किलो धान्य मोफत मिळणार !

राज्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान राबविणार- ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

मुंबई, दि. 7 : दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळे हे मंत्रालय करेल. नव्याने निर्माण करण्यात आलेला दिव्यांग कल्याण विभाग तीन महिन्यांत दिव्यांगांच्या दारी पोहचला असून राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती या अभियानाचे मुख्य मार्गदर्शक (मंत्री दर्जा) आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली.

आज गोरेगाव येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचा कडू यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर, दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदि उपस्थित होते. बच्चू कडू म्हणाले, ‘राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यासाठीची कार्यवाही अल्पावधित पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो’. दिव्यांगांच्या सूचनांप्रमाणे दिव्यांगाचे धोरण ठरवणार असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले.

प्रास्ताविकात दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव, महाजन म्हणाले, दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने दिव्यांग कल्याण विभाग हा सामाजिक न्याय विभागापासून वेगळा करून एक नवीन विभाग तयार केला आहे. दिव्यांग व्यक्तीशी संबंधित सर्व योजना या अभियानांतर्गत शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हर्डीकर म्हणाले, महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांगासाठीच्या योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहे. या कार्यक्रमास दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संपूर्ण कार्यक्रम दिव्यांग बांधवांसाठी सांकेतिक भाषेमध्ये प्रशिक्षकाच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आला.

दिव्यांगांसाठी नवीन शिधा पत्रिका, प्रती महिना 35 किलो धान्य मोफत मिळणार – प्रातिनिधिक स्वरूपात रेशन कार्ड व तीन दिव्यांगांना यूडीआयडी (UDID) कार्ड वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. अधिकृत शिधा वाटप कार्यालय मार्फत दिव्यांगांसाठी नवीन शिधा पत्रिका, शिधा पत्रिका मधील इतर फेरफार व नवीन नाव समाविष्ट करणे, अंत्योदय योजना अंतर्गत, पिवळ्या शिधा पत्रिकेवर प्रती महिना 35 किलो धान्य मोफत मिळेल. या योजनेच्या प्रातिनिधिक स्वरूपात तीन दिव्यांगांना पिवळ्या शिधा पत्रिका वाटप करण्यात आल्या. विधी प्राधिकरणाकडून दिव्यांगांना आज कायदे विषयक मदत आणि विविध बाबींवर सल्ला देण्यात आला. मुंबई पोलिसांच्या स्टॉलवर अनेक दिव्यांगानी भेट देऊन आपल्या अडचणी मांडल्या.

2 हजार 200 दिव्यांग व्यक्तींनी आज नोंदणी केली, तर त्यांच्या सोबत अन्य नातेवाईक, पालक यांनी हजारोंच्या संख्येने विविध स्टॉलला भेट दिली. रोजगाराच्या संधी, रोजगार नोंदणी, उपलब्ध नोकरी आणि त्याचे स्वरूप याचा लाभ दिव्यांग बांधव भगिनींनी घेतला. पालिकेच्या विविध विभागांनी आपल्या स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीच्या योजनाची माहिती दिली. विशेष करून आरोग्य विषयक स्टॉल वर अधिक गर्दी झाली होती. यूडीआयडी (UDID) चा स्टॉल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,महिला आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, एनआयबी, बार्टी, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, कृत्रिम अवयव संस्था अशा विविध संस्थांनी स्टॉल लावले होते. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.

Back to top button
error: Content is protected !!