छत्रपती संभाजीनगर
Trending

वैजापूरचे पदमावती महाविद्यालय, गंगापूरचे छत्रपती शाहु, पैठणचे शिवछत्रपती, सिल्लोडचे नॅशनल महाविद्यालय अ‍ॅकडमिक ऑडिटमध्ये नापास ! जिल्ह्यातील १९ महाविद्यालयांना मोठा दणका !!

तिसऱ्या टप्प्यातील ’अ‍ॅकडमिक ऑडिट जाहीर

Story Highlights
  • जिल्हयातील १९महाविद्यालये ’नो ग्रेड’, दोन महाविद्यालयांना ’डी’ ग्रेड
  • प्रतिष्ठान महाविद्यालय (पैठण) व बापुराव काळे महाविद्यालय (सिल्लोड) या दोन महाविद्यालयांना ’डी’ ग्रेड

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील १९ महाविद्यालये ’अ‍ॅकडमिक ऑडिट’ अर्थात शैक्षणिक अंकेक्षणात ’नो ग्रेड’ अर्थात नापास ठरली आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांची मनुष्यबळ व पायाभूत सुविधा तपासूनच प्रवेश क्षमता स्थगित तसेच कमी करण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून पहिल्यांदाच संलग्नित महाविद्यालयांचे करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २७१ महाविद्यालयांचे अकॅडमिक तर दुस-या टप्प्यात १०२ महाविद्यालयांचे ऑडिट करण्यात आले. शैक्षणिक विभागाच्यावतीने तिस-या टप्प्यातील २१ महाविद्यालयांची ’ऑडिट’ संदर्भातील ’ग्रेड’सह यादी प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीत २१ महाविद्यालयांचा समावेश असून १९ महाविद्यालयांना ए,बी,सी,डी यापैकी एकही श्रेणी प्राप्त झाली नाही.

नो ग्रेड प्राप्त १९ महाविद्यालये पुढीलप्रमाणे : –
१. छत्रपती संभाजीनगर जिल्हा :– राष्ट्रीय महाविद्यालय (गारखेडा), पदमावती महा. (वैजापूर), छत्रपती शाहु (गंगापूर), शिवछत्रपती (पैठण), नॅशनल (सिल्लोड), श्रीनाथ महा. जीवन प्रगती (गंगापूर), पिपल फॉरेन्सिक महा. मातोश्री हौसाबाई आढवले महा., साई फार्मस, कला व विज्ञान महा. (पैठण), काकासाहेब देशमुख महा.(कन्नड), गुरुकुल (फुलंब्री), सीएम आयटी, नॅशनल (सोयगांव), श्रीनाथ मॅनेजेमेंट स्टडीज, नॅशनल (पळसखेळा), एच.बी.(सोयगांव) या महाविद्यालयांचा समावेश आहे. तर प्रतिष्ठान महाविद्यालय (पैठण) व बापुराव काळे महाविद्यालय (सिल्लोड) या दोन महाविद्यालयांना ’डी’ ग्रेड प्राप्त झाला आहे.

केवळ ६१ महाविद्यालयांनाच ’ए’ ग्रेड
तीन टप्प्यात मिळून ३९४ महाविद्यालयांचे शैक्षणिक अंकेक्षण करण्यात आले. यामध्ये ए ग्रेड – ६१ महाविद्यालये, बी ग्रेड – ४८, सी ग्रेड – ५७ तर ९८ महाविद्यालयांना डी ग्रेड प्राप्त झाला तर १३० महाविद्यालये ही ’नो ग्रेड’ श्रेणीत आहेत, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी दिली.

विद्यापीठाचे उत्तरदायित्व: कुलगुरु

आपल्या विद्यापीठाने तीन टप्प्यांत मिळून ३९४ महाविद्यालयांचे ’अ‍ॅकॅडमिक ऑडिट’ केले आहे. नवीन महाविद्यालयांना मान्यता राज्य शासनाकडून तसेच व्यावसायिक महाविद्यालयांना स्वायत्ता परिषदांकडून मान्यता मिळते. तथापि शैक्षणिक दर्जा, अंकेक्षण व गुणवत्ता तपासणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे. विद्यापीठ प्रशासन म्हणून आम्ही आमचे उत्तरदायित्व पार पाडतोय, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!