छत्रपती संभाजीनगर
Trending

कन्नडचा शिवाजी महाविद्यालयाचा संघ ग्रामीण गटात अव्वल, देवगिरी महाविद्यालयाला चॅम्पियनशिप ! विद्यापीठ धाराशिव उपपरिसर संघास पाच पारितोषिके !!

युवा महोत्सवचा जल्लोषात समारोप, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाला ललित कला ढाल

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित केंद्रीय युवा महोत्सवाचा समारोप शनिवारी जल्लोषात झाला. प्रख्यात अभिनेत्री वर्षा ऊसगांवकर व अभिनेते प्रवीण डाळींबकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला.

या महोत्सवात देवगिरी महाविद्यालयाच्या संघाने १६ पारितोषिकांसह संगीत विभागाची ढाल व सर्वोत्कृष्ट संघाचे विजेतेपद पटकाविले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्यूत्तर विभागाच्या संघाने दहा पारितोषिकासह ललित कला गटाची ढाल पटकाविली तर ग्रामीण गटात कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाने ग्रामीण गटात सर्वोत्कृष्ट संघाचे विजेतेपद पटकाविले. गेल्या चार दिवसांपासून उत्साहात सुरु असलेल्या युवा महोत्सवाचा समारोप अष्टपैलू अभिनेत्री वर्षा ऊसगांवकर प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि.सात) झाला.

’सुजनरंग’ या मुख्य रंगमंचावर झाले. यावेळी विद्यापीठाची माजी विद्यार्थीनी प्रख्यात अभिनेत्री वर्षा ऊसगांवकर व मराठवाडयाचे भूमीपूत्र तथा ’घर, बंदूक, बिर्यानी’ या चित्रपटातून नावारूपाला आलेले अभिनेते प्रवीण डाळींबकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर प्र कुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.भारत खंदारे, डॉ.अंकुश कदम, डॉ.योगिता होके पाटील, दत्ता भांगे, डॉ.व्यंकट लांब, डॉ.अपर्णा पाटील, संचालक डॉ.मुस्तजिब खान यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्य प्रा.संभाजी भोसले, डॉ.दासू वैद्य, डॉ.जयंत शेवतेकर, डॉ.शिरीष अंबेकर, डॉ.संजय पाटील देवळाणकर यांची विशेष उपस्थिती होती. मुख्य रंगमंच समोरील सभागृह युवा रसिकांनी खचाखच भरले होते.

विद्यापीठाने ’सेलेब्रिटी’ केलयं : प्रवीण डाळिंबकर
झोपडपट्टीत जन्मलेला माझ्यासारखा माझा ’वांड’ पोरगा युवक महोत्सवातून पुढे आलायं. कष्टाच्या बळावर नट झालो मात्र विद्यापीठाने आज सेलेब्रिटी केलयं, माझ्या जीवनाचं आज वर्तुळ पूर्ण केलयं अशी भावना अभिनेते प्रवीणकुमार डाळींबकर यांनी मांडली. ’घर-बंदुक, बिर्याणी’तून पुढे आलेल्या या मराठवाडयातील भूमीपूत्राने आपल्या भाषणात अनेक वेळा अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. सुमारे अर्धा तासाच्या भाषणात आपला जीवनसंघर्ष मांडला. विवेकानंद महाविद्यालय, युवक महोत्सव, नाटयशास्त्र विभाग ते नागराज मंजुळेचा सिनेमा असे टप्पे त्यांनी मांडले. प्रामाणिकपणे काम केल्यास आपलं नावलौकिक नक्की होईल, तेव्हा विरोध न होता धैर्यांन काम करा, असे आवाहनही प्रवीणकुमार डाळींबकर यांनी केले.

गोव्यातून आले अन् महाराष्ट्राची झाले : वर्षा ऊसगांवकर
चाळीस वर्षांपूर्वी गोव्यातून मराठवाडयात शिक्षणासाठी आले अन् महाराष्ट्रातील यशस्वी अभिनेत्री झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटयशास्त्र विभागाने माझ्यातील कलावंत घडला, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेत्री वर्षा ऊसगांवकर यांनी केले. दामू वैंâकरे व डॉ.लक्ष्मण देशपांडे हे माझे या क्षेत्रातील गुरु आहेत. या काळात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यामुळे मी मराठवाडयाची आजन्म ऋणी राहील. नाटयशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.स्मिता साबळे व विद्यार्थ्यांनी भेट दिलेली ’माहेर ची साडी’ जमन करुन ठेवील, असेही वर्षा ऊसगांवकर म्हणाल्या.

 ’इंद्रधनुष्य’चेही यशस्वी आयोजन करु : कुलगुरु
सलग तीन युवक महोत्सवाचे विद्यापीठाच्या मुख्य परिसरात उत्तम रितीने आयोजन केले. ’राजभवन’ने दिलेल्या ’इंद्रधनुष्य’ राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव यशस्वी करु, असा विश्वास कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले. याच महोत्सवातून घडलेले युवा कलावंत विद्यापीठाचे ’ब्रँण्ड अ‍ॅम्बेसॅडर’ होतील, सेलेब्रिटी होतील, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. डॉ.मुस्तजिब खान यांनी प्रास्ताविक तर प्रा.पराग हासे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.गणेश शिंदे यांनी दिग्दर्शित केलेली ध्वनिचित्रफित प्रारंभी दाखविण्यात आली तर युवक महोत्सवातील पारितोषिकांचे वाचन डॉ.संजय बिरंगणे यांनी केले. या महोत्सवात धाराशिव उपपरिसरातील संघाने पाच पारितोषिके जिंकून लक्षणीय यश मिळविले. नाअयशास्त्र विभागप्रमुख डॉ.गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघाने ही उत्कृष्ट कामगिरी केली.

 विद्यापीठाच्या संघास दहा पारितोषिके
पदव्युत्तर विभागाच्या संघाने ललित कला गटातील चषकासह १० पारितोषिके जिंकली. विभागप्रमुख डॉ.शिरीष अंबेकर, संचालक डॉ.मुस्तजिब खान यांनी या संघास मार्गदर्शन केले.

Back to top button
error: Content is protected !!