महाराष्ट्र
Trending

मोबाईल नंबर अपडेट करा, ‘बत्तीगूल’सह वीज सेवेचे एसएमएस मिळवा ! छत्रपती संभाजीनगर ‍परिमंडलात 95 टक्के ग्राहकांची नोंदणी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० : वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील 12 लाख 34 हजार ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविला आहे. नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील सर्व वर्गवारीतील एकूण 12 लाख 93 हजार 42 वीजग्राहकांपैकी 12 लाख 34 हजार 99 ग्राहकांनी अर्थात 95.44 टक्के ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर या वर्गवारीतील 9 लाख 23 हजार 461 ग्राहकांपैकी 8 लाख 69 हजार 929 ग्राहकांचा अर्थात जवळपास 94.2 टक्के ग्राहकांचा तर कृषिपंप वर्गवारीतील 3 लाख 69 हजार 581 ग्राहकांपैकी 3 लाख 64 हजार 170 ग्राहकांचा अर्थात 98.54 टक्के ग्राहकांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात 6 लाख 10 हजार 731 वीजग्राहकांपैकी 5 लाख 86 हजार 733 ग्राहकांनी, छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात 3 लाख 43 हजार 18 वीजग्राहकांपैकी 3 लाख 22 हजार 992 ग्राहकांनी, तर जालना मंडलात 3 लाख 39 हजार 293 वीजग्राहकांपैकी 3 लाख 24 हजार 374 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे.

या ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख ही माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठवण्यात येत आहे. परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा सर्व वर्गवारीतील 95.44 टक्के ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी झालेली आहे.

असे असले तरीही ज्या ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक बदलायचा आहे, अशा ग्राहकांनी तसेच ज्यांना नव्याने क्रमांक नोंदवायचा अशा ग्राहकांनी 24 तास सुरू असणाऱ्या 1912 किंवा 1800-212-3435 व 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकांवर, https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp या संकेतस्थळावर किंवा महावितरण अ‍ॅपवर नोंदणी करावी, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

ब्रेकिंग न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर लाईव्ह गुगल अ‍ॅप इन्स्टॉल करा

Back to top button
error: Content is protected !!